उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन : दादांची अकाली एक्झिट: महाराष्ट्रावर शाेककळा

Kolhapur news
By -

 

          


    पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग करताना भीषण अपघात झाला. विमान शेतात कोसळल्याने त्याला आग  लागल्याने या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे.


अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 9 च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले आणि आग लागली.


 अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.


पीटीआय वृत्तसंस्थेनेही या अपघाताची माहिती देत असताना अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.


बारामती : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे. आपल्य लाडक्या नेत्याच्या मृत्यूमुळे बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला असून, शहरात अत्यंत हृदयद्राकव व विदारक दृश्य दिसून येत आहे. येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, आपल्या नेत्यासाठी अनेकजण ढसाढसा रडताना दिसत आहेत.


अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद केली आहेत. आजूबाजूच्या गावातील हजारो नागरीक व कार्यकर्ते बारामती शहराच्या दिशेने येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा ताफा जमा झाला असून, आमचे दादा आम्हाला परत द्या, अशा आर्त हाका मारताना घाय मोकलून रडताना दिसत आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


    पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावरील अजित पवारांसह सर्वांचेच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेत. या अपघातामुळे मृतदेहांची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, त्यांची अद्याप ओळख पटू शकली नाही.


आम्ही तांत्रिक तपासणी व ओळख पटवण्याची प्रक्रिया वेगाने करत आहोत, असे गिल यांनी स्पष्ट केले. सध्या बारामतीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी लोकांच्या मनातील भावना अनावर झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.


             --------------------------------