श्री.अजित पवार हे लोकनेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.
- पंतप्रधान , नरेंद्र मोदी
दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला
अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले अशा प्रकारचे नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात.
- मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आज विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे.
या दुःखाच्या क्षणी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.
- राहुल गांधी , काँग्रेस नेते
अजित पवार यांच्या अकाली जाण्याने राज्याचे नुकसान भरून निघणार नाही.
- ज्येष्ठ नेते शरद पवार
सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एकाच शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यांनी devasted असे व्हॉटसअप स्टेटस ठेवून आम्ही उद्धवस्त झालो आहोत, अशा भावना व्यक्त केल्या आहेत .
- खासदार सुप्रिया सुळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे, अशी भावना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी, एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे .अजित पवार चुकीला चूक म्हणत होते. ते मनाने अतिशय निर्मळ होते. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळातही काम केले. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अजित पवारांनी या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याचे उत्कृष्ट काम केले. त्याचा अनुभव मला आहे. एकदा करायचे ठरवले की ते करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये नव्हते.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
- राज ठाकरे , मनसे अध्यक्ष
दादांचा रुबाबदार, प्रेमळ स्वभाव आवडायचा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. "शब्दच नाहीत," दादांसोबत पहिल्या सरकारमध्ये तसेच काही काळ विरोधी पक्षात काम करण्याचा अनुभव आठवला. विधिमंडळाच्या कारभारावर असलेली त्यांची रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव अनेकांना भावायचा,
- आदित्य ठाकरे
आमचा "दादा" गेला.......!
नामदार अजितदादा पवार हे नावाप्रमाणेच आम्हा सर्वांचे खऱ्या अर्थाने "दादा" होते. एक मित्र, एक भाऊ, एक नेता अशा विविध रूपांमध्ये आम्ही सर्वांनीच त्यांना अनुभवले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र एका चांगल्या प्रशासकाला व जनतेविषयी प्रचंड आस्था आणि तळमळ असलेल्या एका दूरदृष्टी असणाऱ्या प्रगल्भ नेत्याला कायमचा मुकला आहे. सबंध महाराष्ट्रावर हा आघातच इतका प्रचंड आहे की, या दुःखातून आमच्यासारखे कार्यकर्ते सावरुच शकत नाहीत.
- ना. हसन मुश्रीफ , वैद्यकीय शिक्षण मंत्री
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अशा प्रकारे अकाली जाण्याने महाराष्ट्राने कर्तबगार, खंबीर आणि सामान्यांशी नाळ जोडलेला नेता गमावला असून मनाला चटका लावणारी ही घटना आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अजितदादांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे.
- प्रकाश आबिटकर , पालकमंत्री
महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असल्याचे म्हणावे लागेल, राज्याचे नेते अजित पवार यांच्या कर्तृत्व व नेतृत्वाला महाराष्ट्र आज मुकला आहे. महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेले अंगदान महाराष्ट्र को सिमानाही एक उत्पाही व जिल्तप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला आहे.
- आ. सतेज पाटील
अजितदादा... तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच ! माझ्यासाठीच नव्हे, तर तुमचं हे असं अकाली निघून जाणं सगळ्या महाराष्ट्रासाठीही दुर्दैवच... अजितदादा, खरंच तुम्ही असं जायला नको होतं. महाराष्ट्राला, बारामतीला अजूनही तुमची गरज होती. एक राजकारणी म्हणून अजित पवार यांचा प्रवास खूप वर्षांपासून पाहिलाय. महायुती सरकारमध्ये अजितदादांचा पक्षही आला. त्यामुळे अजितदादांना आणखी जवळून पाहता आलं. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता, अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास-माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं.
- चंद्रकांत पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री
अजित दादांच्या शिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण बेचव आणि आळणी .
- संजय राऊत , संपादक सामना
--------------------------

