यावर्षीचा शाहू पुरस्कार दिवंगत इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांना जाहीर

Kolhapur news
By -

 

             


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


     राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टमार्फत दिला जाणारा मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा दिवंगत इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या शाहू जयंतीदिनी अर्थात 26 जून 2026 रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यंदाचा पुरस्कार हा चाळीसावा आहे. 1984 पासून शाहू पुरस्कार देण्यात येतो पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.


 डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि व्यासंगी इतिहास संशोधक म्हणून होती. त्यांनी मराठेशाहीचा इतिहास आणि शाहू महाराजांच्या विचार जगभरात पोहोचवण्याचे आयुष्यभर मोलाचे कार्य केले. डॉ. पवार यांनी मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी 40 पेक्षा जास्त इतिहास ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांनी संपादित केलेला बाराशे पानांचा शाहू स्मारक ग्रंथ इतिहास संशोधनातील मैलाचा दगड मानला जातो. त्यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून शाहूंचे चरित्र मराठी आणि परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. 


डॉ. पवार यांनी मराठ्यांचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्र या विषयावर 40 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पत्रकार परिषदेला आयुक्त राजेंद्र भारूड, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.


              --------------------------