कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर फक्त पुरात बुडणारच शहर नाही तर तलावावर वसवलेलं भारतातील एकमेव शहर आहे. कोल्हापूर हे नावच कोल-खोल-खोलगट भूभाग अशा भौगोलिक रचनेवरून पडलेलं आहे. मुंबई कसे बेटावर वसलेले प्राचीन शहर आहे. तसेच कोल्हापूर हे तलावावर वसलेले प्राचीन शहर आहे. अंबाबाई मंदिरही सखल भागात आहे. या मंदिरातही एक झरा आहे. हा झरा मणिकर्णिका कुंड नावाने ओळखला जातो.*
कोल्हापूर शहरात प्रवेश करताना पहा - पन्हाळ्याकडून, गगनबावड्याकडून, निपाणी कडून, हातकणंगलेकडून, गारगोटीकडून येताना पहा - उतार आहे. शिवाय कोल्हापूर शहर लहान लहान टेकड्यांचे शहर आहे. जशा टेकड्या आहेत तसेच सखल भागही ठिकठिकाणी आहेत. पहा - अगदी अंबाबाई मंदिर, कपिल तिर्थ मार्केट-कपिलतिर्थ तळे, गांधी मैदान असे असंख्य तलाव होते. दलदलीच्या भाग होता. यामुळे मुळातच जास्त पडणारा पाऊस-पाणी अधिक प्रमाणात जिरत होते. अलिकडच्या काळात पाणी जिरविण्याचा यशस्वी प्रयोग शिवाजी विद्यापीठाने केला आहे.
कोल्हापूरची लोकसंख्या वाढेल तसे एक एक तलाव, तळी, विहिरी मुजवून वसाहती झाल्या. कोल्हापूरातून वाहत असलेल्या जयंती व दुधाळी या नद्यांमुळे तलाव, विहिरींना बारा महिने पाणी असायचे. पंचगंगा नदीनेही कोल्हापूरला वळसा घातला आहे. आजही या नद्यांना बारा महिने पाणी आहे मात्र हे पाणी प्रचंड प्रदुषित केले आहे.
कोल्हापूरच नव्हे तर सर्वच ठिकाणी जिथे मोकळी जागा आहे तिथे पाणी जिरविण्यासाठी चरा मारल्या पाहिजेत. प्रदूषित पाणी कोणत्याही पाणवठ्यात सरळ मिसळू न देता शुध्द करून सोडावे किंवा कोल्हापूरातील ७४ उद्यानात हिरवाई साठी वापरावे.
बाष्पीभवन नियंत्रणात राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, झुडूपं यांची लागवड करून याचं संवर्धन केले पाहिजे.
अर्थातच पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.
- भारतभूषण केशव गिरी.
-----------------------

