कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोकणातनं काय आणू ? आंबं, फणस, कोकम..
कायबी नगं , फकस्त पाऊस घेऊन येवा.
हा संवाद आहे शेतकरी नवरा बायकोचा. कोकणात कसल्यातरी कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याने आपल्या गावाकडच्या बायकोला फोन केला.
"काय गं, हितलं काम आता संपलंय. उद्या निघणार. काय आणू? आंबं अजुन हाईत, ताजं फणस आल्यात, कोकम आवडतंय तुला.आणू का "
"यातलं काय बी नगं. फकस्त पाऊस घेऊन येवा. बायकोनं पोट तिडकी नं सांगितलं."
या एका छोटया संवादाने पावसा अभावी शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीची जाणीव होईल.ढगाकडे आशेने पाहात बसलेल्या सुखदेव तुकाराम वारके या शेतकऱ्यांना या बाबत विचारलं तर त्यांनी हताश पणे सांगितले
." आमचा वाली एकच.पाऊस.!"
त्यांच्या उदगारात आर्तता होती, अपेक्षा होती, विश्वास सुद्धा होता.
वारके यांनी पावसा अभावी शेतीचे कसे नुकसान होत आहे ते सविस्तर सांगितले.
भात पेरलं, सोयाबीन पेरलं,. पाऊस पडेल म्हंटलं.दोन्हीला आता मोड आल्यात, पावसाच्या थेंबा साठी आ करून बसल्यात. पाऊस न्हाई पडला तर आल्यालं मोड वाळून जातील. वाळवी लागायला सुरुवात झालीय.
उसाला तळाला हुमणी लागलीय. ती मुळं कुरतडून टाकतीय. हे तर शेतकऱ्याचं नगदी पीक हाय. ते बी गेलं तर त्यो कर्जात बुडून मरणार.
शेतकऱ्यांचे हे शब्द काळजाला पिळ पाडणारे आहेत.
निसर्ग हा शेतकऱ्याचा तारण हार आहे. चार महिन्याचा पाऊस तर त्याचा जीवस्य कंठस्य मित्र आहे.
तो रागावणार नाही. पण अल निनो ने त्याला सागरावर अडवलंय. दोन दिवस उशीरा का होईना तो येणार आहे. आपल्या जिवलग मित्राची ओल्या अंगाने गळाभेट घेणार आहे.
सद्या जरी थोडा श्वास कोंडला असला तरी उद्या वारा घोंगावत येणार आहे.अधून मधून आकाशात वाऱ्याचे आवाज ऐकू येऊ लागलेत.
सद्या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकर मागे रांगा लागल्या आहेत.त्या मुळे नदीतून उपसा बंदी आहे.जंगलातले प्राणी पाणी शोधत नागरी वस्तीत येऊ लागलेत. एखादी शिकार सुद्धा ते गावाजवळच्या शेतात, झोपडीत शोधत आहेत.
ती माऊली म्हंटली तेच खरं आहे.
"आंबं, फणस, कायबी नगो.फकस्त
पाऊस घेऊन या.."
---------------------------


