कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळातर्फे आयोजित १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षेला आज मंगळवार, १६ जून रोजी शांततापूर्ण वातावरणात सुरुवात झाली. परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी मंडळाने 'कॉपीमुक्त अभियान' प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार केला असून, प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक निगराणी ठेवण्यात आली आहे.
पहिले पेपर उत्साहात-
आज पहिल्या दिवशी १० वीच्या मराठी विषयाचा आणि १२ वीच्या इंग्रजी विषयाचा पेपर होता. परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज शहरातील एस. एम. लोहिया ज्युनियर कॉलेज (पेटाळा) येथील १२ वीचे केंद्र आणि न्यू हायस्कूल (पेटाळा) येथील १० वीच्या केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. संपूर्ण विभागात परीक्षा गैरप्रकारमुक्त पार पडल्याची माहिती मंडळाने दिली आहे.
परीक्षेची व्याप्ती आणि नियोजन-
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत एकूण ५९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे. यामध्ये १० वीसाठी ३४ आणि १२ वीसाठी २५ केंद्रांचा समावेश आहे. एकूण ११,२७९ विद्यार्थी या पुरवणी परीक्षेत प्रविष्ट झाले आहेत.
जिल्हानिहाय परीक्षार्थी संख्या:
कोल्हापूर: ३,९२५ परीक्षार्थी (२४ केंद्रे)
सांगली: ४,३२६ परीक्षार्थी (२० केंद्रे)
सातारा: ३,०२८ परीक्षार्थी (१५ केंद्रे)
'कॉपीमुक्त' मोहिमेसाठी कडक पावले-
परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी मंडळाने कडक धोरण अवलंबले आहे:
सीसीटीव्ही सक्ती:प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असून त्याचे फूटेज सुरक्षित ठेवण्याच्या सक्त सूचना शाळा प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
दक्षता समितीचा वॉच:जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि भरारी पथकांमार्फत परीक्षेवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
संवेदनशील केंद्रांवर विशेष नजर:उपद्रवी व संवेदनशील केंद्रांची यादी निश्चित करून तिथे विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गैरप्रकार आढळल्यास केंद्रचालक व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
मंडळाने विद्यार्थ्यांसाठी "बोर्ड परीक्षेचा राजमार्ग" ही पुस्तिका आणि उत्तरपत्रिका लेखनाबाबतचे मार्गदर्शक व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत. विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना कोणताही गैरमार्ग न अवलंबता आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे. १० वीची परीक्षा ३० जूनपर्यंत, तर १२ वीची परीक्षा ८ जुलैपर्यंत चालणार आहे.
---------------------

