कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही गतिमान होत असून जिल्ह्यातील हजारो नागरिक बेघर होणार असून त्यांच्या निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. त्यांचे संसार कुटुंब उघड्यावर येणार असून जनावरे गुर ढोरं यांचा निवारा जाणार आहे.या कारवाईच्या धास्तीने अतिक्रमण धारकांची तारांबळ उडाली असून त्यांच्या समस्या लक्षात घेऊन पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने आवाज उठवला जाणार असून प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिला आहे.
आमच्या निवाऱ्याची व्यवस्था काय ? शासनाने अगोदर आमच्या निवाऱ्याची सोय करावी, आम्हास बेघर करू नये. आम्ही कुठं राहायचं, संसार उघड्यावर येणार असे एक ना अनेक प्रश्न त्यांना भेडसावू लागले आहेत.
ज्यांच्या अतिक्रमणावर कारवाई होणार आहे त्यांना एकटे पडू दिले जाणार नाही पुरोगामी संघर्ष परिषद अतिक्रमण धारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय लढा उभारला जाणार आहे . त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होण्याचे आवाहन प्रा.सुभाष वायदंडे यांनी केले आहे.
