कोल्हापूर न्यूज / वि .रा.भोसले
हे चित्र आहे मुरगूड च्या तलाव परिसराचे.
एका कर्तव्यदक्ष शिवभक्तांने तेथे गोळा केलेल्या या दारू बियरच्या बाटल्या .
रिकाम्या आहेत हं !
कोणी टाकल्या त्या इथे ?
दारुड्यांनी.
नशा करायची तर तुमच्या घरात ,शेतात नाही तर बियर बार मध्ये करा.
कधितरी तुमची पोरे बाळे सुध्दा तेथे फिरायला आणि पाण्यात डुबक्या मारायला जातील.काचांचे तुकडे त्यांच्या हाता पायांना फाडतील आणि रक्तबंबाळ करतील .
ते पाहून तरी नशा उतरेल का ?
दुसरं असं की या तलावाचे पाणी नुसते शेती साठी नाही.मुरगूड, शिंदेवाडी, यमगे या गावच्या नागरिकांना पिण्यासाठी सुध्दा वापरले जाते.त्यांनी काय असले उष्टे पाणी प्यायचे की वॉटर बॉटल घेऊन फिरायचे ?
अरेरे काय हे ?
लघुशंका आणि शौच्य सुध्दा तिथेच करायचे .
बिर्याणीचं खरकटं आणि पत्रावळ्या पाण्यात टाकायच्या ?
ही कपोलकल्पित कथा नाही .भयानक सत्य आहे.
किती सुंदर तलाव आहे !
मुरगूड चे छोटे काश्मीर येथे आहे.सकाळ संध्याकाळ आया बहिणी,दादा वहिनी येथे फिरायला येतात.
शुगर वाले सुध्दा असतात हं ! कांहीं अनवाणी असतात.या बाटल्या त्यांच्या जीवावर बेततील.
या शहराला स्वच्छतेचे पारितोषिक मिळाले आहे.
एकदा नव्हे दोनदा.
त्यात तलाब असेल किंवा नसेल .त्याचे पाणी मात्र असेल.
शहराचा वाढ तलावाच्या बाजू बाजूने होऊ लागली आहे.दुसरीकडे तितकी जागाही नाही.उसाचे फड शहराला वेढा घालून आहेत.त्यातून समृद्धी डोकावते आहे.
तेव्हां या सगळ्यांचा विचार करून तलावाला
वाचवले पाहिजे.
पूर्वेच्या बाजूला टेकडीवर पसरलेली ती हिरवाई ,लक्ष्मी मंदिर आणि शेजारचा शिवगढ.
ही सगळी संपदा मनाला किती शांती देते.!
पश्चिमेचा मातीचा बंधारा ,दरवर्षी पावसाळ्यात अंघोळ करणारा वळणदार डांबरी रस्ता ,उत्तरेला भव्य दगडी धरणाचे कोरीव बांधकाम.
मराठीच काय तर हिंदी सिनेमाला सुध्दा शूटिंगला येतील असे हे मनमोहक सौंदर्य आहे.
त्याला कुरूप करू नका.


