कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीतून निश्चित झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हा महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मी प्रचाराला तर येणारच आहे, पण विजयी सभेलाही येणार आहे, असं वचन मी महाराजांना दिलं असल्याचे उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांच्या भेटी प्रसंगी सांगितले शिवसेनाप्रमुखांनंतर १९९७ नंतर प्रथमच याठिकाणी आल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले , मी आज शाहू महाराजांचा भेट घेतली आहे. ठाकरे कुटुंब आणि छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत. मला आनंद आहे की, ते ऋणानुबंध या पिढीतही आणि पुढील पिढीतही कायम राहतील.
कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. फक्त त्यांच्या नावाच्या घोषणेच्या औपचारिकता बाकी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराजांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजयी करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. मी त्यांच्या भेटीला आत्ताच आलो पण महाराजांच्या प्रचाराला आणि विजयी सभेला सुद्धा येणार आहे, असे वचन उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज यांना दिले. तर या लढाईत आम्ही लढत असून त्यात यश मिळण्यासाठी मी आज शाहू महाराजांचे आशीर्वाद देखील घेतल्याचे मत ठाकरेंनी व्यक्त केले.

