भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी कधी होणार जाहीर

Admin
By -

 

भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी कधी होणार जाहीर

कोल्हापूर न्यूज - eXclusive l दि.४/३/२०२४


केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचेही नाव पहिल्या यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, नारायण राणे यांचीही धाकधुक वाढली आहे.


भाजपने आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार नाही. त्यामुळे महाराष्ट्राची यादी कधी जाहीर होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील नेत्यांना लागली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचेही नाव पहिल्या यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, नारायण राणे यांचीही धाकधुक वाढली आहे. दुसरीकडे, भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने भाजपची दुसरी यादी कधी जाहीर होणार याची तारीख सांगितली आहे. त्यामुळे या यादीत तरी महाराष्ट्रातील नेत्यांची नावे असणार का? या चिंतेत राज्यातील भाजप नेते आहेत.

शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीमधून अनेकांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलीय. तर, काही जणांचा पत्ता कट केलाय. काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. त्यामुळे भाजपमध्ये सध्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ असे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने दुसरी यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे असे म्हटलेय.

भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर होऊ शकते, असे संकेत दिले आहेत.

बुधवारी नवी दिल्लीला पक्षाची बैठक आहे. त्यासाठी मी जात आहे. याच दिवशी शक्यतो लोकसभा उमेदवारांची कर्नाटकासह दुसरी यादी अंतिम केली जाऊ शकते. या यादीबाबत अंतिम निर्णय सर्वोच्च नेतृत्व घेईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.