कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायलयाने आपला निकाला दिला आहे. कोर्टाने 5 पैकी 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेसह 5 लाख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हत्येच्या 11 वर्षांनंतर हा निकाल आला आहे. बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्याशी संबंधित खटल्यांसाठी विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जाधव यांनी हा निर्णय दिला. निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांचा समावेश आहे. 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यातील भरवस्तीत सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण? हे अजूनही समोर आलेले नाही अशी प्रतिक्रिया निकालानंतर हमीद दाभोलकर यांनी दिली.
दाभोळकरांची हत्या 2013 साली झाली. त्याच्या आठ वर्षांनंतर सीबीआयने 5 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपींविरोधात खटला सुरू झाला. यानंतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेण्यात आल्या. आणि निकाल 10 मे 2024 रोजी आला आहे.

