कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीन जागा आमच्या हक्काच्या आहेत आणखीन दोन जागा आम्हाला हव्यात अशी मागणी जयंत पाटील यांच्याकडे केली आहे . या पाच जागामध्ये कागल ,कोल्हापूर उत्तर, राधानगरी ,चंदगड आणि इचलकरंजी या जागांचा समावेश आहे.
कागल मध्ये महायुतीचा उमेदवार हा जवळपास निश्चित असल्यामुळे महाविकास आघाडीला या मतदारसंघात तगडा उमेदवार हवा आहे . समरजीत घाटगे यांच्या रूपाने असा तगडा उमेदवार महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता असल्याने तसेच दहा वर्षे तयारी केलेले आणि हसन मुश्रीफांना टक्कर देऊ शकणारे उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे . शरद पवारांनी हसन मुश्रीफांना अनेक वर्षे चाल देऊनही ते शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्या सोबत गेल्याने शरद पवारांच्या मनात त्यांच्याविषयी असणाऱा राग ते या विधानसभा निवडणुकीत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार हे काँग्रेस पक्षाचे असले तरी या मतदारसंघातून शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत आहेत. गेल्या ४० वर्षात त्यांचा विविध क्षेत्रात असलेल्या जनसंपर्काचा विचार करता ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत . त्यांच्याबरोबरच माजी महापौर आर के पाेवार ही इच्छुक आहेत पण या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्याची शक्यता कमीच आहे .
चंदगड मतदार संघातून नंदाताई बाभुळकर इच्छुक असून बाबासाहेब कुपेकर यांचे अनेक वर्षे या मतदारसंघावर वर्चस्व होते ,त्यानंतर संध्यादेवी कुपेकर यांनीही या मतदारसंघाचे नेतृत्व केल्यामुळे व कुपेकर घराण्याची या मतदार संघात चांगली ताकद असल्यामुळे नंदाताई बाभुळकर या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत . तर काँग्रेसने आप्पी पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली असल्यामुळे या दोघांपैकी कोण याचा महाविकास आघाडीत निर्णय होऊन हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे .
राधानगरी मतदारसंघातून माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील इच्छुक आहेत . मध्यंतरी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना के पी पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीतून ही जागा जर शरद पवार गटाकडे गेली तर के पी पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते . यापूर्वी के पी पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार म्हणून या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहेच.
इचलकरंजी मतदारसंघातून माजी नगरसेवक मदन कारंडे हे शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या विषयी असणाऱ्या सहानुभूतीचा या मतदारसंघात फायदा होईल असे सांगितले जाते. तसेच १९ नगरसेवक व प्रमुख लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत असल्यामुळे ही त्यांची बाजू भक्कम मानली जाते .
कोल्हापूर जिल्ह्यातील वरील पाच मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे. त्यामधील कागल , राधानगरी आणि चंदगड या तीन मतदारसंघावर तर त्यांची जास्त भिस्त आहेच पण कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी या दोन जागांसाठी ही राष्ट्रवादी शरद पवार गट आग्रही आहे. पण याविषयीचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत वरिष्ठ पातळीवरच होणार असल्यामुळे, तोपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चाना ऊत आला असून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत .

