कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुलांनी IAS, IPS सारख्या स्पर्धा परीक्षांत यश मिळवावे अशी पालकांची अपेक्षा असल्यामुळे पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी अधिक परिश्रम घ्यावेत असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थी, नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांच्या शिक्षकांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. शिल्पा खोत यांची प्रमुख उपस्थिती होती .
यापूर्वी प्रज्ञाशोध परीक्षेत कागल तालुका मागे होता. मात्र यंदा मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. पुढील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेतही कागल तालुका अव्वल येण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली. पालकांची मानसिकता सकारात्मक बदलत आहे. शिक्षणाशिवाय भविष्य नाही, ही जाणीव निर्माण झाली आहे. आपल्या मुलांनी आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षांत यश मिळवावे, अशी अपेक्षा प्रत्येक पालक बाळगून आहे. त्यामुळे ते शिक्षणासाठी आवश्यक तेवढा खर्च करण्यासही तयार आहेत.
नामदार मुश्रीफ म्हणाले , सध्या सीबीएसई, आयसीएसईसारख्या केंद्रीय मंडळांबरोबरच राज्य मंडळाच्या शाळांमधील स्पर्धा वाढली आहे. पालक आपल्या पाल्यासाठी दर्जेदार शिक्षण देणारी शाळा निवडत आहेत. इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय ज्या शाळांमध्ये सक्षमपणे शिकवले जात नाहीत, त्या शाळांची पटसंख्या कमी होताना दिसते. त्यामुळे या विषयांचे अध्यापन प्रभावीपणे केल्यास पटसंख्या वाढीस नक्कीच मदत होईल. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांच्या हातात आहे. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी अधिक परिश्रम घ्यावेत. आवश्यक असल्यास शिक्षक भरतीत बदल करून इंग्रजी माध्यमात शिकलेले तसेच गणित- विज्ञान विषयातील तज्ज्ञ शिक्षकांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे म्हणाले, कागलची ओळख शिक्षणाचे विद्यापीठ म्हणून करण्याची गरज आहे. शाळांची पटसंख्या कमी होत आहे, ती वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सीएसआर फंडाचा उपयोग शाळांच्या विकासासाठी करता येईल. विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळांना डिजिटल करण्याची गरज आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपले सर्व सहकार्य राहील. सीईटी परीक्षाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू. विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण राहू, असेही श्री. घाटगे यांनी सांगितले .
स्वागत व प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कसोटे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा खोत, सुरेश सोनगेकर , बाळासाहेब निंबाळकर, शिक्षण सभापती शितल यादव आदींनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, उपसभापती इंद्रजीत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. शिवानी भोसले, सौ. सुयशा घाटगे, श्रीमती शोभाताई फराकटे यांच्यासह पंचायत समिती सदस्य सौ. तेजस्विनी भोरे, सौ. सुवर्णा कांबळे, अनिलकुमार हेगडे, दत्तात्रय दंडवते, सुनिता माळी, सौ. रूपाली अंगज , दीपक सोनार, सौ. मनीषा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. गावडे यांच्यासह सर्व शाळांचे केंद्रप्रमुख, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन, व्हा .चेअरमन, सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढी, कागल तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था, राजर्षी शाहू माध्यमिक शिक्षक पतसंस्था, सर्वोदय गृह तारण सोसायटी कागलचे संचालक, सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संघटना पदाधिकारी, सर्व गटसमूह केंद्र सदस्य, शिष्यवृत्ती नियोजन समिती सदस्य यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------------------


