छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला.

Kolhapur news
By -

 


            


        सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 


    छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भव्य समारंभात छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थापनासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाने तब्बल 5 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर राज्य सरकार व नौदल विभागाच्या परवानगीनंतर या पुतळ्याचे बांधकाम सुरू झाले होते. पण आता हा पुतळा पडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.