कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गाेरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळायचे झाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत. यासाठी आपण शिक्षण मंत्री असल्यापासूनच सर्व शिक्षा अभियान राबविण्यात आले. ज्या शाळांना १०० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या शाळांच्या इमारती नव्याने बांधू, सर्व शाळांना सोलर पॅनल बसवू, सर्व शाळा डिजिटल करू, त्याची सुरवातही झाली आहे. तसेच शिक्षकांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याही भविष्यात पूर्ण केल्या जातील असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल तालुक्यातील प्राथमिक आजी-माजी शिक्षकांचा स्नेह मेळावा माजी आमदार संजयबाबा घाटगे व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमरीशसिंह घाटगे यांनी आयोजित केला होता. त्याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. माजी आमदार संजयबाबा घाटगे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'गेल्या दशकात खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्राथमिक शाळांच्या पुढे आव्हान होते. यापुढे आपण सर्वांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. आपल्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे आहे. १०० वर्षपूर्ती केलेल्या सर्व शाळा इमारत बदलण्याची मोहीम हाती घेतली असून त्यासाठी ६० ते ७० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. भविष्यात या सर्व शाळा टप्प्याटप्प्याने पूर्ण करून अत्याधुनिक शाळा इमारत सर्व शाळांच्या वर सोलर पॅनल बसवले जाईल. शाळा डिजिटल होतील. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचे मोलाचे सहकार्य झालेले आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांना आपण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तो केवळ आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना आणि तुम्हा सर्वांना स्वास्थ लाभण्यासाठीच.. बारकाईने सर्व गोष्टींचा विचार केला तेव्हा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अनेक धक्के बसलेले आहेत. सामान्य माणसासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ज्यांचे दार उघडे आहे असे राज्यातील एकमेव मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांचा लौकिक आहे. त्यांची येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी पाठराखन करूया.
गोकुळचे संचालक अमरीश घाटगे म्हणाले, विरोधकांना तुरुंगात डांबून आपण आमदार होण्याचे दिवस स्वप्न पाहणारे एका बाजूला आहेत. आणि सातत्याने सर्वसामान्य जनतेला स्वास्थ्य कसं लाभेल याचा विचार करत अहोरात्र काम करणारे मंत्री हसनसाहेब मुश्रीफ एका बाजूला आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी त्यांची स्टार प्रचारक म्हणून भूमिका बजावावी. आपल्याला काठावरचा विजय नको आहे, तर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवायचा आहे. म्हणूनच आपण सर्वांनी एकजुटीने काम करण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला आहे.
प्रकाश मगदूम, सुकुमार पाटील, जी. एस. पाटील, सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी व रमेश जाधव यांनी यांनी केले. आभार किशोर जाधव यांनी मानले.
यावेळी वसंत जाधव,ओमाजी कांबळे , साताप्पा साठे, सुरेश खोत, अरविंद पाटील, मोहन पाटील, प्रदीप बुधाळे- पाटील, एल. डी. पाटील, बाळासाहेब बामणे, संजय पोवार, वैशाली कोंडेकर, विजया चव्हाण, रोहिणी लोकरे ,मुनिरा आवटेआदी उपस्थित होते.
--------------------------------------------
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे सहकार्य....
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना उर्जितावस्था देण्यासाठी ज्या ज्या सोयी सुविधा देण्याचा आपण निर्णय घेतला त्या सर्वांच्या मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन व प्राथमिक शिक्षणाकडे शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे नामदार मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
-------------------------------
सावित्रीच्या लेकीकडून जिल्हा बँक संचालकपदी निवड झाल्याबद्दल यावेळी संजयबाबांचा सत्कार करण्यात आला
---------------------------------------------------





