माजी सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ

Kolhapur news
By -

 

          


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


माजी सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव महिपतराव गायकवाड यांचे बुधवारी (वय ६७ ) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  त्यांच्या निधनाने व्याख्याता, प्रामाणिक अधिकारी व निस्वार्थ भावनेने काम करणारे व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दांत शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.


     प्राथमिक शिक्षक ते सहायक शिक्षण उपसंचालक अशी त्यांची कारकिर्द होती. सन २०१५ मध्ये ते सहायक शिक्षण उपसंचालक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची ‘आई’या विषयावरील व्याख्याने गाजली होती.


संस्कारक्षम पिढी घडावी यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. राज्यातील विविध भागात त्यांनी व्याख्याने दिली. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता समाजाप्रती कर्तव्य म्हणून त्यांनी व्याख्यानातून प्रबोधनाचे कार्य केले. त्यांना भ्रष्टाचाराविषयी प्रचंड तिटकारा होता.भेडसगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले.सांगली येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून छाप पाडली. प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. शाळा तपासणीला गेल्यावरही ते स्वत: चा दुपारच्या जेवणाचा डबा सोबत नेत होते. सेवानिवृत्तीनंतर लेखन, व्याख्यान या माध्यमातून प्रबोधन करत राहिले. ठिकठिकाणी व्याख्याने दिली.


बुधवारी, सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता गायकवाड, भाऊ सेवानिवृत्त शिक्षक सी. एम. गायकवाड, मुलगा, मुलगी, जावई, बहिण असा परिवार आहे . 


                 ---------------------