पुणे : राज्यातील अनेक कलाकेंद्रांमध्ये डान्स बार व डीजे सुरू असल्याचा गंभीर आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ पुरावा दाखवला असून, त्यात विविध कला केंद्रांत सुरू असलेला धिंगाणा दिसून येत आहे.
सुरेखा पुणेकर यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील आरोप केला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात डान्स बारवर बंदी आहे. पण त्यानंतरही अनेक सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये खुलेआमपणे डान्स बार व डीजे सुरू आहे. राज्यातील 82 पैकी 42 कलाकेंद्रांत हा प्रकार सुरू आहे. या डान्स बारवर तत्काळ बंदी घालण्यात यावी. यामुळे अनेक संगीतकार, कलाकार व वाजंत्री हे देशोधडीला लागले आहेत.
सुरेखा पुणेकर यांनी आपल्या आरोपांची पुष्टी करताना एक व्हिडिओही दाखवला. त्यात 3 ते 4 महिला साडी नेसून डान्स करताना दिसून येत आहेत. त्या डीजेच्या तालावर डान्स करत असून, काही तरूण त्यांच्यावर पैसे उधळताना दिसून येत आहेत. ते त्यांच्याशी अश्लिल चाळे करतानाही दिसून येत आहेत. सुरेखा पुणेकर यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
राज्यात 62 लोकनाट्य कलाकेंद्र
राज्यात 62 लोकनाट्य कला केंद्र आहेत. या कला केंद्रांना लायसन्स दिले आहेत. यामधील 20 कला केंद्रांना नियमावली लायसन्स दिले आहेत. यानुसारच पेटी, तबला, ढोलकी, घुंगरू, नृत्यांगना आणि सोंगाड्या, गायिका या कलाकेंद्रामध्ये चालू आहेत. राज्यातील 38 कला केंद्रामध्ये डीजे सुरू आहे.
----------------------------------

