जुनी पेंशन संघटनेचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा' : २५०० च्या वर शिक्षकांचा विराट मोर्चा

Kolhapur news
By -

 


           

       



    

               कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

  रद्द करा रद्द करा,शिक्षणसेवक पद रद्द करा,

सन १९८२ / ८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा,गोर गरिबांच्या शाळा बंद करणारा संचमान्यतेचा अन्यायी निर्णय बदला,आश्वासित योजना लागू करा,समान काम समान वेतन अशा अनेक मागण्याचा आक्रोश करत महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेने आज  जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी प्राथमिक, महानगरपालिका,नगरपालिका शिक्षक व शिक्षणसेवकांच्या वतीने उपसंचालक कार्यालयावर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

  दुपारी ३ वाजता आक्रोश मोर्चा  टाऊन हॉल महानगरपालिका , बिंदू चौक मार्गे  शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला. यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन मंगेश धनवडे व मोर्चा त सहभागी शिक्षक संघटना नेत्यांनी दिले,यानंतर

मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना,शिक्षक, शिक्षणसेवक यांनी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्याचा गजर केला.वेगवेगळ्या मागण्याचे फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते.मोर्चेकर्यांनी हातात घेतलेले विविध मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले,महिलांची संख्या लक्षणीय होती.


यावेळी मोर्चात आक्रोश व्यक्त करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी शासनाला खडे बोल सुनावले ते म्हणाले,समान काम समान वेतन या सूत्रानुसार शिक्षण सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक सारखे वेठबिगारी पद रद्द न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल. जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लढण्यास सज्ज आहे. रणरणत्या उन्हात आज जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी आक्रोश व्यक्त करून हा संदेश दिला आहे की येणाऱ्या काळात या दोन विषयांना घेऊन लढाई अधिक तीव्र करण्यात येईल. शिक्षण सेवक पद रद्द करावे, डीसीपीएस व्याज व अनुदान मिळावे, शिक्षकांसाठी आश्वासित या आंदोलनाची दखल घेऊन यथोचित कार्यवाही न झाल्यास भविष्यकाळात राज्यस्तरावरती तीव्र लढा उभा केला जाईल. समान काम समान वेतन आणि सर्वांसाठी एक पेन्शन हे तत्व राबवले गेलेच पाहिजेत. गोरगरिबांचे शिक्षण टिकले पाहिजे यासाठी अखंड महाराष्ट्रात आक्रोश मोर्चाचा जागर केला जाईल.असे ते म्हणाले.


          राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा-


समान काम समान वेतन या सूत्रानुसार शिक्षण सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक सारखे वेठबिगारी पद रद्द न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल. जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लढण्यास सज्ज आहे. रणरणत्या उन्हात आज जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी आक्रोश व्यक्त करून हा संदेश दिला आहे की येणाऱ्या काळात या दोन विषयांना घेऊन लढाई अधिक तीव्र करण्यात येईल.


अमर वरुटे,जिल्हा सल्लागार


      -----------------------------


      आंदोलनातील प्रमुख मागण्या .... 

१) शिक्षण सेवक पद रद्द व्हावे. 

२) ०१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना मार्च २०२१ नंतर डीसीपीएस योजनेतील व्याज व अनुदान मिळावे. 

३) ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जाहिरात व अधिसूचना नियमाचा लाभ व्हावा. 

४) १५ मार्च चा संच मान्यतेचा शासन आदेश रद्द व्हावा. 

५) सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुरुस्त व्हावी. शिक्षकांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू व्हाव.

६) अनुकंपा शिक्षकांसाठी टीईटी ची अट रद्द व्हावी. 

७) खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांना स्थगित केलेला अर्जीत रोखीकरणाचा लाभ मिळावा.

८) पगार नियमित वेळेवर व्हावेत. 


या मोर्चात  सर्व संघटनांचे प्रतिनिधी 

या आंदोलनात  जुनी पेंशन संघटनेचे सल्लागार- शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे, श्रीनाथराव पाटील, विजय रामाने, मारुती फाळके,विभागीय अध्यक्ष सागर खाडे,सांगली चे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,राजेंद्र कोरे,बालाजी पांढरे, निलेश कारंडे, संतोष गायकवाड, विश्वनाथ बोराटे, प्रमोद पाटील,  सुनील पाटील, महिला जिल्हाध्यक्ष आरती पोवार, संजय भोसले, बी एल कांबळे, राहुल कांबळे, मारुती पोवार,यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी बहुसंख्येने सहभागी झाले होते.


    या आंदोलनाला शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत येणाऱ्या शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक संघटना, कास्ट्राईब, नपा, मनपा,खाजगी,अनुदानितच्या सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता.


यावेळी एस.डी.लाड, भरत रसाळे, सांगली जुनी पेंशन चे जिल्हाध्यक्ष अमोल माने,सागर खाडे, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे,शिक्षक संघ राज्य संपर्क प्रमुख राजमोहन पाटील,गौतम वर्धन, संघटनेचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड,कार्याध्यक्ष बालाजी पांढरे,शिक्षणसेवक जमीर तांबोळी,नीलम जाधव, किरण शिंदे यांची भाषणे झाली.

  

   मोर्चात अडीच हजारच्या वर  शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेन्शन संघटनेच्या आजवरच्या मोर्चात हा एक अभूतपूर्व संख्येत झालेला मोर्चा होता.मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले.


           --------------------------------------