मुंबई :लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा होते का? याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागून होते. मात्र, सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींची निराशा करण्यात आली. कारण अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सन्माननिधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांसाठी किमान वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. तर शेतकरी कर्जमुक्ती वर मात्र अजित पवार यांनी बोलणे टाळले.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. 7 लाख 20 हजार रुपयांच्या या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 साठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, यामध्ये योजना हप्ता वाढवण्यावर कोणतीही घोषणा झाली नाही.त्यामुळे लाडक्या बहीणींना 2100 रुपये मिळणार नाहीत, तर 1500 रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
नरेंद्र मोदींच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प - अजित पवार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. 'महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही...' असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, 'विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा'चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा अकरावा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केला.
गुलाबी जॅकेटवाले लाडक्या बहिणींना विसरले
ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला. निवडणुकी आधी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता गुलाबी जॅकेट ही विसरले आणि लाडक्या बहिणींना विसरले अशी टीका काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. पण या बजेट मध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही, लाडक्या बहिणींचा उल्लेख ही भाषणात नाही. एकीकडे लाडकी बहिण योजनेत वेगवेगळे निकष लावून महिलांना अपात्र केले जात आहे दुसरीकडे निधी वाढवून दिला नाही यावरून तिजोरीत खडखडाट असल्याचे स्पष्ट आहे असे विधी मंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.
-----------------------------------



