कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील कोल्हापुरातील केडीसीसी बँकेच्या वारणानगर शाखेत 3 कोटी 22 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात वारणानगर शाखेतील पाच कर्मचाऱ्यांविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी चार कर्मचाऱ्यांना अटक केली असून एक कर्मचारी अद्याप फरार आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) च्या वारणानगर शाखेत घोटाळा उघडकीस आला असून, आर्थिक व्यवहाराशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची व केवायसीची तपासणी सुरू असताना हा प्रकार समोर आला. खातेदारांच्या बनावट व बोगस सह्यांचा वापर करून स्लीप व चेकच्या माध्यमातून रक्कमा काढण्यात आल्या. तसेच, खातेदारांच्या नावाने बनावट खाती उघडून त्यातूनही पैसे वळते करण्यात आले. काही बंद खात्यांमधील शिल्लक रक्कमाही बेकायदेशीररीत्या काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
पन्हाळा तालुक्यातील माले येथील लिपिक मुकेश पाटील, आरळे येथील कॅशियर शिवाजी पाटील, कोडोली येथील महिला कॅशियर मीनाक्षी कांबळे आणि शरीफ मुल्ला या चौघांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणातील प्रमुख संशयित, वारणानगर शाखेचा शाखाधिकारी आणि पन्हाळा तालुक्यातील कळे गावचा रहिवासी तानाजी पोवार सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
--------------------