अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकरला जन्मठेप

Kolhapur news
By -

 

              


      पनवेल : सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच २० हजारांचा दंडही सुनावण्यात आला आहे. तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी म्हणजेच कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोन आरोपींना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१६ मध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली.


बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचंच समोर आलं. तर महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. मात्र याप्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आलं. ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपध्दतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले.


अश्विनी बिद्रे यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई करण्यात केली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते. उच्च न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.


११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची बाब उघड झाली. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता. अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या याप्रकरणी अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली. दरम्यान पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


अश्विनी बिद्रे पोलिस दलात २००५ साली रूजू झाल्या होत्या. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली होती. पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अश्विनी व अभय कुरूंदकर हे दोघेही त्यापूर्वीच विवाहित होते व त्यांना पत्नीसह मुले होती. कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे तिने पती राजू गोरे सोबतचे संबंध तोडले. अश्विनीला पती राजू गोरे पासून एक मुलगी आहे.. अश्विनीने अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचेच नव्हते. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता तर बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा डाव रचला. यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले व अश्विनीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिज मध्ये ठेवले होते. कुरूंदकरला याप्रकरणात राजू पाटील आणि कारचालक कुंदन भांडारी यांनी साथ दिली. महेश फळणीकर व राजू पाटीलच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकून विल्हेवाट लावली.

        --------------------------------------