२१डिसेंबर , निवडणूक निकालाचा रविवार, उमेदवारांना हॅपी वाला संडे ठरणार , की अवास्तव अंदाजांचे भांडे फुटणार.

Kolhapur news
By -

        

          


          काेल्हापूर न्यूज  /  वि.रा.भोसले  


       २१ डिसेंबर चा निवडणूक निकालाचा रविवार .कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकनियुक्त नगराध्यक्ष/ नगराध्यक्षा आणि नगरसेवक / नगरसेविकांच्या निवडणुकीचा निकाल  या रविवारी लागणार आहे.

  उत्सुकता, तणाव,धाकधूक, आत्मविश्वास ,मतदारांच्या बद्दलची कृतज्ञता ,अशा अनेक संमिश्र भाव भावनांनी भारलेला असा हा दिवस आहे.सोबत आहे कडाक्याची थंडी आणि फोडायची आहे लोकशाहीने उंचावर टांगलेली सत्तेची हंडी.

     अंतिम निकालच असल्यामुळे अंदाज बांधण्याची वेळ संपली आहे.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीने एक धडा मात्र सर्वांना शिकवला आहे.तो म्हणजे मतदार राजा जागा झालाय.

    तो  चोखंदळ झाला आहे .अगदी उसाच्या फडात कोयता चालवणारा कामगार असो किंवा एसी मध्ये बसून फायलीत रमलेला बँकेचा मॅनेजर असो,किंवा एस टी तून अर्ध्या तिकिटावर प्रवास करणारा जेष्ठ नागरिक असो. कोणी कसलाच अंदाज देत नाहीत.महिला वर्ग तर त्याहून हुशार.

    "कुणाला मत टाकलीस गं ? "

असा मैत्रिणीचा फोन आला तर सांगेल

 " दूध हाय शेगडीवर ,नंतर.बोलू."

 असं म्हणून फोन कट करेल.

   युवा वर्ग आपापल्या नेत्यांच्या बाबतीत अंदाजांचे चौकार आणि षटकार ठोकत असतो.

   प्रचार यंत्रणेचा प्रभाव कितपत होता हे देखील येथे महत्वाचे आहे.प्रचाराचा मुख्य मुद्दा असतो त्या त्या शहराचा विकास.

  याही बाबतीत मतदार खुप जागरूक झाला आहे.लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो ते फक्त शहराच्या विकासासाठीच नव्हे तर लोकांच्या दैनंदिन गरजा सुद्धा त्यांनी  समजून घ्याव्यात यासाठी त्यांना निवडून देतो असे मत मतदार मांडताना दिसतात. अंगणातल्या घोंगड्यावर येऊन बसणारा ,दवाखान्यातील पेशंटला भेटून त्याची विचारपूस करणारा, पोरांच्या शिक्षणाची चौकशी  करणारा ,रेशन च्या रांगेत सुद्धा येऊन भेटून जाणारा नगरसेवक सामान्य मतदारांना अधिक भावतो.युवा मतदार विकासाऐवजी रोजगाराच्या शोधात असतात.बेरोजगारांच्या वाढत्या समस्या हा फार मोठा सामाजिक प्रश्न बनला आहे.गांजा,गुटखा, मद्यपान यासारख्या घातक व्यसनापासून युवकांना परावृत करणारा  नेता हवा हवासा वाटतो. हातावरचे पोट असलेल्या तळातल्या मतदारांसाठी पैशाचा वापर सुद्धा होतो.

      गट तट यांची परंपरा जोपासणारा सुद्धा एक वर्ग असतो. नेतृत्वाची निष्ठा जोखणारा  रत्नपारखी मतदार सुध्दा आढळतो.

   या सर्वांचे उत्तर उद्याच्या निकालात मिळणार आहे.लोकशक्ती किती प्रभावी असते याचे उत्तर सुद्धा २१ डिसेंबरच्या रविवारी मिळणार आहे.

 हा रविवार काहींना हॅप्पीवाला संडे  असेल तर काहींच्या अवास्तव अंदाजाचे भांडे  फोडणाराही असेल.


       ---------------------------------