मुरगूड मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे प्रचंड उत्साह.

Kolhapur news
By -

 

            






        

   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


           मुरगुड येथे नगरपरिषदेसमोरील शिवतीर्थ परिसरात शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.  पुरोहितांच्या मंत्रोच्चारासह शिवरायांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला.

 

   दिनांक ५जून पासूनच या उत्सवाला खरा प्रारंभ झाला.आदल्या दिवशी विद्युत रोषणाईसह पताका व पुष्पहारांची सजावट करण्यात आली.गड पूजन व शोभा यात्रा काढण्यात आली.शिवछत्रपती राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी निघाले तेंव्हा प्रथम पाटगाव येथे मौनी महाराजांचे दर्शन  घेण्यासाठी गेले .मुरगूड च्या दक्षिण वेशीवर हेमाडपंथी बांधकामाचे बिरोबा देवालय असून त्या देवालयात ते  घटकाभर विश्रांतीसाठी थांबले होते.त्या बिरोबा देवालयापासून ते शिवतीर्थावरील अश्वारूढ पुतळ्यापर्यंत काढलेल्या शोभा यात्रेत शेकडो शिवभक्त सामील झाले होते.महिलांनी ओवाळणी करून आपला सहभाग नोंदवला. सायंकाळी गोंधळ कार्यक्रमात विरश्रीयुक्त पोवाडे व गीतांचा समावेश होता.

  

  दिनांक ६ रोजी सायंकाळी विद्युत झोतांचा (लेसर शो) कार्यक्रम जल्लोषी संगीताच्या तालावर साकारण्यात आला.संपूर्ण शिवतीर्थ परिसर प्रचंड गर्दीने व्यापून गेल्याने जवाहर रोड वरून होणारी वाहतूक बाजारपेठ व पाटील नगर  रस्त्यावरून वळविण्यात आली होती.

  

  मुरगूड शहरांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला साजेसा असा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.

   

शहरातील सर्व शिवप्रेमी तरुणांच्या  संयुक्त सहभागामुळे कार्यक्रमास भव्य स्वरूप प्राप्त झाले होते.


               ---------------------------