सरकारला सुद्धा एक सासू असते. कधी ती मातोश्रीत राहते. तर कधी बारामतीत दिसते.

Kolhapur news
By -

 

           


         कोल्हापूर न्यूज /  वि.रा.भोसले  


        सरकारला सुद्धा एक सासू असते असे म्हटल्यास वावगे होणार नाही. महाराष्ट्र सरकारला पण अशी एक सासू आहे असे वाटते. कधि ती मातोश्री वर राहते तर कधी बारामतीत दिसते. हे असं भलतंच काय. असे तुम्हाला वाटेल. घराघरात सासू आणि सून हे नातं सुरी आणि भोपळा यासारखे मानले गेले आहे.सासूची पहिली इनिंग संपलेली असते. आता हाताखाली सून आलेली असते. सून ही  खरे म्हणजे आपल्या मुलीसारखी. पण ती दुसऱ्या घरातून आलेली असल्याने सासूला ती मुलगी वाटत नाही. तिला घालून पाडून बोलणे ,तिच्या चुका काढणे हा आपला धर्म आहे असं तिला वाटते.

    उद्धव ठाकरे यांना सरकार वर टीका करणे किंवा शिव्या देण्यासाठी कोणतीही सबब पुरेशी असते. मराठी भाषा,हिंदी सक्ती,पूरग्रस्त शेतकरी , अदानी ,अंबानी,मुंबई आमच्या हक्काची वगैरे कांहीही विषय चालतो.त्यांच्या पक्षातील अनेक दिग्गज नेते व आमदार, खासदार पक्ष सोडून गेल्यामुळे त्यांची अवस्था वैफल्यग्रस्त  कुटुंब प्रमुखांसारखी झाली आहे.अशी भूमिका अनेक कुटुंबात सासूबाईच सांभाळत असतात. उद्धवजीना जी राजकीय प्रतिष्ठा मिळाली आहे ती त्यांच्या कर्तृत्वावर नसून वडिलांच्या प्रभावामुळे मिळाली आहे.मुळात उद्धवजी यांचा स्वभाव तुसडा , शिवराळ व कोणाची पर्वा न करणारा असा आहे असे त्यांचे सोडून गेलेले कार्यकर्ते म्हणतात.अनायासे पक्ष प्रमुख पद मिळाल्याने त्यांना राजकीय मंच उपलब्ध झाला आहे.संजय राऊत सारखे काही वाचाळ वीर सोबत आहेत. प्रसार माध्यमाना टीआरपी साठी अशी माणसं लागतात.


   तिकडे बारामतीच्या आशीर्वादाने रोहित पवार नावाचे एक नवे प्रवक्ते उदयास आले  आहेत. त्यांच्याही पक्षात फुट पडल्याने सत्तेची खुर्ची बाय करून निघून गेली  आहे. तिचा विरह मनाला अस्वस्थ करतोय.सध्याच्या सरकारमध्ये विरोधी पक्ष नेता हे पदच नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलासाठी तसा प्रयत्न केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी दाद दिली नाही.सभागृहात विरोधी नेता नसल्याने बाहेर राहून   सरकारला शिव्या देण्याचे काम हे नेते करत असतात. थोडक्यात कुटुंबातल्या खाष्ट सासुबाईची भूमिका ते बजावत असतात.सरकारमध्ये सुद्धा असे काही कसलेले नेते  आहेत. सत्तेच्या गॅलरीत उभे राहून ते विरोधात असलेल्या  सासू बाईंना  प्रत्युत्तर देत असतात.खेड्यातल्या एका सुनेचे उदाहरण मजेशीर आहे.सासू तिला शिव्यांची लाखोली वाहत असते. अनेक टोमणे मारत असते. सून तिला फक्त एका शब्दात उत्तर देते. तूच ....

सासू आणखी चिडते. तिचा तिळपापड होतो.सुनेचे उत्तर मात्र ठरलेलं असतं. 


मुंबई महापालिकेच्या निवडणूकीचे रणशिंग लवकरच फुंकले जाईल.स्थानिक स्वराज्य संस्था कामाला लागल्या आहेत.सरकारमध्ये तीन प्रबळ पक्ष आहेत.लाडकी बहीण,शेतकरी मदत, रोजगार हमी,याशिवाय विकासाचे अनेक खमंग विषय आहेत.सभागृहात विचारणारे प्रमुख कोणी नाही.त्यामुळे विरोधकांना हंबरडा आंदोलन ,मोर्चे, सभा,मेळावे,यासारखे उपक्रम हाती घ्यावे लागत आहेत. सून बाई दाद देत नाही म्हणून आदळ आपट करणाऱ्या सासुबाई सारखे त्यांचे हे वागणे आहे असेच वाटते.घरच्या चाव्या पण सुनबाई कमरेला लाऊन फिरते.त्यामुळे सासूबाईंचा पारा जास्तच चढतो.

     यापूर्वी राज्यासाठी एक नारा होता.

 "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ."

   आताचे चित्र थोडे विचित्र वाटतंय.

   "कुठे चाललाय राज्याचा संसार सारा ."

   असे जनतेच्या मनात आले तर नवल नाही.


                 --------------------------