कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तलावातील पाणी दूषित झाल्यामुळे दोन महिन्यापूर्वी मासे मृत झाले होते , याविषयीचे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध झाल्यानंतर चिखलीकरांनी एकत्रित येऊन श्रमदान करून दूषित पाण्याला बाहेर जाण्याचा मार्ग करून देत तलाव परिसर स्वच्छ केल्याने तलावातील माशांना जीवदान मिळाले होते पण परत एकदा तलाव परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
एकेकाळी गावाचे वैभव असणारा हा तलाव आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे तलाव खरोखरच स्वच्छ झाला का, पाण्यावरील शेवाळ गेले का, तलावाच्या सभोवतालची सर्व झाडे निघाली का आणि त्यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण थांबले का, पाण्याचा हिरवटपणा गेला का, पानोता रस्त्यावरील कचरा निघाला का, तलाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेणारी तरुणाई परत नव्याने पुढाकार घेणार काय ? असे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे तलाव स्वच्छतेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे, जेणेकरून तलावातील मासे मृत होणार नाहीत व पाणी स्वच्छ राहील.
खरंतर तलाव स्वच्छतेसाठी प्रयत्नशील राहणे ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीने आपली जबाबदारी पार पाडली तर तलावाचे सौंदर्य आणि स्वच्छता अबाधित राहील .
-------------------------------

