कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
कोल्हापूरचा एक रिक्षा ड्रायव्हर आणि मागे बसलेला प्रवासी यांच्यात झालेला हा संवाद शहरातील परिस्थितीबद्दल खूप काही सांगून जातो.
प्रवासी : "सावकाश रे बाबा . रिक्षा खड्ड्यात घालू नकोस मला कमरेचा त्रास आहे. "
ड्रायव्हर: " काका काय सांगायचं तुम्हाला. कोल्हापुरात सगळं चांगल हाय फक्त रस्त्यांची बोंबाबोंब हाय .
एक खड्डा चुकवावा तर दुसऱ्या खड्ड्यात चाक जातंय.
प्रवासी : नगरसेवक नाहीत का ? त्यांना सांगावे.
ड्रायव्हर: नगरसेवक न्हाईत पण अधिकारी हाईत .ते बी तसलंच. काका, खरं सांगू का . जनतेची मनापासून सेवा करणारा हा कोणीबी न्हाई. आमच्या कडून कर वसूल करायचा आणि खिसं ह्येनी भरायचं.पावसाळ्यात आम्हीं पन्हाळा ते पावनखिंड पायी गेलो. जंगलातलं ते रस्तं ह्याच्या पेक्षा चांगलं असतील.आमच्यात मुली पण होत्या.छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत धावत होतो. शिवा काशिदला सलाम करून जयजयकार करत होतो. हिम्मत वाढत होती. इथं कुणाचं नाव घ्यायचं.?
प्रवासी: कोल्हापूर म्हणजे स्वराज्याची दुसरी राजधानी आहे. आम्हांला अभिमान वाटतो.
हा संवाद दहा मिनिटांचा असला तरी गेल्या दहा वर्षांत करवीरचा चेहरामोहरा कसा बदलून गेलाय हे सांगतो.
परवा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या प्रशासक यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन बैठका घेतल्या. पहिला बैठकीत त्यांनी शहरातील पॅचवर्क आणि डांबरीकरण तसेच इतर सुधारणा याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर महिना दीड महिन्याच्या अंतराने दुसरी बैठक झाली. मंत्री महोदयांनी आढावा घेतला तर परिस्थिती आहे तशीच ठप्प आढळून आला . निर्ढावलेल्या अधिकाऱ्यानी गुळगुळीत उत्तरे द्यायला सुरुवात केली. एखाद्या ग्रामपंचायतीत बोलावे तसे ते अधिकारी बोलताना पाहून पालकमंत्र्यांनी त्यांची चांगलीच झडती घेतली.
त्यांनी स्पष्ट आदेश दिले की ज्यांना काम जमत नसेल त्यांनी घरात बसावे.
पालकमंत्री खरं म्हणजे जनतेच्या मनातीलच बोलले होते. पालकमंत्र्यांनी कोणत्याही राजकीय लाभाचा विचार न करता मांडलेली ही स्पष्ट भूमिका करवीरकरांना कौतुकास्पद वाटली. त्यांच्या तोंडून सहज उदगार निघाले पालकमंत्री असावा तर असा.
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासन यांना दिलेले निर्देश हे सुद्धा विचार करण्यासारखे आहेत. कामचुकारपणा करणाऱ्या किंवा तिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची पदे काढून घ्या ,असे त्यांनी सांगितले. मंत्री महोदयांचा असा पाठिंबा मिळताच भारतीय लोकसेवा आयोगाच्या या कर्तबगार अधिकाऱ्यांना सुद्धा जोष आला.कोल्हापूरचा चेहरा बदलायचा असेल तर चुकार अधिकारी आणि कर्मचारी यांना फैलावर घेतलेच पाहिजे.
खाली माना घालून पत्त्यांच्या डावात रमलेल्या खेळाडूंच्या घोळक्यात वरून पेटलेला फटाका टाकावा तशी त्यांची अवस्था झाली.
पालकमंत्र्यांच्या या थेट कारवाईला दाद द्यावी असे वाटते.
काय कमी आहे कोल्हापुरात ?
"आम्ही कोल्हापुरी जगात भारी " असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. भर मध्यरात्री तरुण मुली कामावरून रिक्षाने किंवा दुचाकीने घरी परततात. त्या भय मुक्त असतात. रिक्षावाले आणि तरुण पोरं भावा प्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे असतात.एक प्रकारचा कोल्हापुरी बाणा प्रत्येकाच्या मना मनात रुजला आहे.
कोल्हापुरी चप्पल,मिसळ, वडा पाव, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, आकडी दूध,तालमीतून तयार होणारे महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी , राजघराण्यावरील निर्हेतुक प्रेम या सर्वांचा एक वेगळाच करिष्मा या नगरीला लाभला आहे.
त्र्यंबक सीताराम कारखानीस नावाच्या झोपडीतल्या निस्वार्थी कार्यकर्त्याला खांद्यावर घेऊन विधानसभेत धाडणारे हे पुरोगामी विचारांचे कोल्हापूर आहे.
दक्षिण काशीची पुण्याई आणि करवीरनिवासिनी महालक्ष्मीचे पावित्र्य सुद्धा या शहराने जपले आहे ,पोसले आहे.
पालक मंत्र्यांच्या धडाडीचे करवीरकरांनी कौतुक केले आहे.
पाठीवर थाप देऊन प्रत्येक करवीरकर म्हणतो पालकमंत्री असावा तर असा.
----------------------------

