कोल्हापूर न्यूज नेटवर्क
संबोधी प्रतिष्ठान, सातारा या संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या २७व्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांची निवड करण्यात आली आहे . अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी दिली.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य,कला, संस्कृती व परिवर्तनाची चळवळ आदी क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या हेतूने १९९८ सालापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह,शाल, गुच्छ असे आहे.
यावर्षीचा २७ वा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार डॉ. मेघा पानसरे यांना श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते येत्या ७ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराच्या मानकरी डॉ. मेघा पानसरे या शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी स्थापन केलेल्या श्रमिक प्रतिष्ठानच्या विश्वस्त असून महाराष्ट्रातील स्त्रीयांच्या चळवळीत त्या सक्रिय आहेत. कॉम्रेड पानसरे,डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी देशभरच्या मोहिमेत सहभागी होऊन न्याय मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष जारी ठेवला आहे.
रशियन भाषा विषयक विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. रशियन भाषा साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय 'सिर्गेइ इसेनीन पुरस्काराने तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्यांनी अनुवादित व संपादित केलेली 20 पुस्तके प्रकाशित झाली असून ४0 रशियन कथा, कवितांचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. राजर्षी शाहू महाराजांचे डॉ. जयसिंगराव पवार लिखित चरित्र त्यांनी रशियन भाषेत अनुवादित केले आहे.
डॉ. मेघा पानसरे यांनी आंतरजातीय - आंतरधर्मीय विवाह केंद्राची स्थापना केली असून आतापर्यंत सत्यशोधक व साध्या पद्धतीचे शंभरावर विवाह लावले आहेत.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्काराने आतापर्यंत डॉ. ज्योती लांजेवार (नागपूर),प्रा.पुष्पा भावे (मुंबई), रजिया पटेल (पुणे), बेबीताई कांबळे (फलटण), यमुनाबाई वाईकर (वाई),प्रा.डाॅ.प्रज्ञा दया पवार(मुंबई), उर्मिला पवार (मुंबई), डॉ.सिसिलिया कार्व्हालो (वसई),प्रा.डॉ.इंदिरा आठवले (नाशिक), पद्मश्री तिस्ता सेटलवाड (मुंबई),हिरा बनसोडे (मुंबई), प्रतिमा जोशी (मुंबई), उल्का महाजन (पनवेल),प्रा. सुशीला मूल-जाधव (औरंगाबाद), डॉ.गेल ऑम्वेट (कासेगाव), मेधाताई पाटकर (मुंबई),संध्या नरे-पवार (मुंबई),मुक्ता दाभोलकर (दापोली), मुक्ता मनोहर (पुणे),प्रा.आशालता कांबळे ( मुंबई), अॅड.निशा शिवूरकर (संगमनेर) व शिल्पा कांबळे (मुंबई),चेतना सिन्हा (म्हसवड-माण), सुनीता भोसले (आंबळ,शिरुर -पुणे),छाया कोरेगावकर (मुंबई), मंगल खिंवसारा ( संभाजीनगर -औरंगाबाद )आदी मान्यवर महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
---------------------

