पणजी : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा ते दलित असल्यामुळेच झाला आहे, असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. भूषण गवई हे स्वतःच्या मेहनतीने सरन्यायाधीश झाले. पण सवर्ण समाजातील काही लोकांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे आठवले म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
रामदास आठवले सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पणजी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत भूषण गवई हे दलित समाजाचे असल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच हल्ला करणाऱ्या वकिलावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रोसिटी) कारवाई करण्याचीही मागणी केली. रामदास आठवले म्हणाले, भारताच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारचा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भूषण गवई हे दलित समाजातून आलेले आहेत. त्यांचे वडील केरळ व बिहारचे राज्यपाल होते. त्यांनी कठोर अभ्यास करून व स्वतःच्या प्रयत्नांनी प्रथम मुंबई उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात स्थान मिळवले पण सवर्ण समाजातील काही लोकांनाही पटत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
रामदास आठवले यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा निषेध केल्याचा उल्लेख आवर्जुन केला. या निंदनीय घटनेनंतर मोदींनी सरन्यायाधीशांना फोन करून खेद व्यक्त केला. पण आरोपीवर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची माझी मागणी आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर आरोपी वकील राकेश किशोर यांनी 'सनातन धर्म का अपमान नहीं सहेंगे' अशी नारेबाजी केली होती. त्यानंतर आता दलित समाजाच्या एका मोठ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री रामदास आठवले यांनीच या वकिलावर अट्रोसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केल्यामुळे विरोधकांना सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची आयती संधी मिळाली आहे.
------------------

