कोल्हापूर न्यूज नेटवर्क
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेचा व्रतस्थ वसा जपला. त्यातून जनतेनेच त्यांना पुढारपण बहाल केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा ऐंशीवा वाढदिवस व सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असा समारंभ बुधवारी पोलिस ग्राऊंडवर लोकोत्सव म्हणून जनसागराच्या साक्षीने साजरा झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जेथे जेथे संघर्ष तेथे तेथे 'पुढारी' पोहोचला. 'पुढारी'ने लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवले. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात 'पुढारी'चे योगदान अविस्मरणीय आहे, असे उद्गार अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. जाधव यांनी, जनतेचे ऋण ही माझ्या मर्मबंधातील ठेव असल्याचे भावपूर्ण उद्गार काढले. 'पुढारी' हा जनतेच्या मनामनातील दीपस्तंभ असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. डॉ. जाधव यांच्यामुळे 'पुढारी' महाराष्ट्रात ताठ मानेने उभा असल्याचे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले, तर 'पुढारी'मुळे आम्ही 'पुढारी' झालो, अशा भावना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या. 'पुढारी'चे चेअरमन आणि 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी प्रास्ताविकात या सोहळ्याची भूमिका मांडली आणि साहेब हे पत्रकारितेचे विद्यापीठ असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या भव्य-दिव्य समारंभाला व्यासपीठावर बहुतांश मंत्री, आमदार, खासदार आदी उपस्थित होते; तर पुणे-मुंबईपासून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून 'पुढारी'वर प्रेम करणाऱ्या जनसागराची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.
पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव नागरी गौरव समितीच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते तलवार, सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला, तर सौ. गीतादेवी जाधव यांचा पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ऐलिस परेड मैदानावर बुधवारी अलोट जनसागराच्या साक्षीने हा दिमाखदार सोहळा झाला.
व्यासपीठावर पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष, खासदार शाहू महाराज,व विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे, पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण, वातावरणीय बदल पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य विकासमंत्री व मंगलप्रभात लोढा, मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार, गृह राज्यमंत्री योगेश कदम, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आ. राजेश क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील, राज्य स्वयं-पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, आ. प्रवीण दरेकर, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. राहुल आवाडे, आ. डॉ. अशोकराव माने उपस्थित होते.
जनतेचे ऋण ही माझ्या मर्मबंधातली ठेव : डॉ. प्रतापसिंह जाधव
जनतेच्या ऋणातून मुक्त व्हावे, असे आपल्याला वाटत नाही. कारण, हे ऋण म्हणजे आपल्या मर्मबंधातली ठेव आहे. आज वयाच्या ८० व्या वर्षी माध्यमातील बदलांकडे पाहताना अनेक गोष्टी आठवतात. आज डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेय. डीपफेक न्यूजचे पेवच फुटलेय. मात्र, विश्वासार्हता हाच पत्रकारितेचा आत्मा असून, हे शाश्वत मूल्य बदलत नाही याचे भान ठेवा, अशा शब्दांत 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या गौरवाला उत्तर दिले.
सामाजिक इतिहासात पुढारीचे योगदान अविस्मरणीय : शरद पवार
जिथे जिथे संघर्ष, तिथे तिथे 'पुढारी' जाऊन पोहोचतो. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यात दैनिक 'पुढारी' अग्रेसर असतो. म्हणूनच सामान्य जनतेच्या मनात 'पुढारी'ने ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात 'पुढारी'चे योगदान अविस्मरणीय आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांच्या अंतःकरणात 'पुढारी'चे स्थान कोरले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले.
दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव हे वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचा 'सहस्रचंद्रदर्शन सोहळा' व त्यांनी आपल्या पाच तपांचा प्रदीर्घ पत्रकारितेचा लेखा-जोखा मांडलेले 'सिंहायन' या आत्मचरित्रपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२५ ) पोलिस मुख्यालयामधील मैदानावर झाला. त्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शरद पवार यांनी गौरवोद्गार काढले.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे सामान्य जनतेसाठी योगदान अमूल्य : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
कोल्हापूरच्या मातीचा सुवास, राजर्षी छत्रपती शाहूरायांचा विचार आणि पत्रकारितेचं अधिष्ठान दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले आहे. 'पुढारी' हे केवळ वृत्तपत्र नाही, तर महाराष्ट्राच्या मनामनात प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा गौरव केला. सत्तेला आरसा दाखवण्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढणारे डॉ. जाधव यांनी कोल्हापूर आणि सामान्य जनतेसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. टोल नाके हटविण्यापासून सीमावादाच्या लढ्यापर्यंत, जनतेच्या प्रश्नावर त्यांनी कायम आवाज उठवला आहे.
निर्भीड नेतृत्वामुळेच 'पुढारी' महाराष्ट्रात ताठ मानेने उभा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नेहमीच तत्त्वनिष्ठ आणि निरपेक्ष भावनेने पत्रकारिता केली. स्वतःचे राजकीय विचार कधीही वृत्तांकनात न आणता त्यांनी सत्य आणि तत्त्वांवर आधारित पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखाली 'पुढारी' महाराष्ट्रात ताठ मानेने उभा आहे. या दैनिकाच्या वर्चस्वाला कोणीही धक्का देऊ शकत नाही. कारण, 'पुढारी' हे केवळ वृत्तपत्र नसून बहुजन विकासाचे माध्यम बनले आहे असे गौरवउद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
'पुढारी' मुळे आम्ही पुढारी झालो : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
दै. 'पुढारी'ने अनेक सामाजिक चळवळीत योगदान दिले आहे. अनेक वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. दै. 'पुढारी' मुळेच आम्ही पुढारी झालो, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दै. 'पुढारी'चा गौरव केला.
माझे जुने मित्र शरद पवार आणि नवीन मित्र देवेंद्र फडणवीस असा उल्लेख मंत्री आठवले यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला. खा. शरद पवार यांना उद्देशून बोलताना मंत्री आठवले म्हणाले, शिर्डीमध्ये पराभवानंतर तुम्ही मला राज्यसभेवर येण्याची संधी दिली; मात्र होकार दिला असता, तर तुमच्यासोबत राहावे लागले असते. मंत्री झालो नसतो. केवळ राज्यसभेवर राहिलो असतो. तुम्ही मला मंत्री केले नाही. नरेंद्र मोदींसोबत गेलो आणि मंत्रीही झालो. मंत्री आठवले म्हणाले, वसंत कांबळे-लिंगनूरकर यांनी घेतलेली २००६ मध्ये माझी मुलाखत दै. 'पुढारी'तून छापली.
कोल्हापूरच्या विकासात दैनिक 'पुढारी'ची छाप : खासदार शाहू महाराज यांचे गौरवोद्गार
कोल्हापूरच्या विकासावर दैनिक 'पुढारी'ची छाप आहे. कोल्हापूरच्या जडणघडणीत 'पुढारी'चा वाटा मोठा आहे, असे गौरवोद्गार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा नागरी गौरव समितीचे अध्यक्ष, खासदार शाहू महाराज यांनी काढले.खा. शाहू महाराज यांनी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे काही मागण्या मांडल्या. ते म्हणाले, अंबाबाई मंदिर विकासाच्या नुसत्या चर्चाच होत आहेत. त्याला निधी कधी मिळणार? मंदिर परिसर विकासासाठी निधी मिळावा . विकासकामे सुरू झाली पाहिजेत. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाले; मात्र खंडपीठ होण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे सुरू करावी. कोल्हापूर-पुणे वंदे भारत रेल्वे दररोज सुरू करावी.
राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, असे सांगून खा. शाहू महाराज म्हणाले, शासनाने पुढील वर्षी जूनपर्यंत कर्जे माफ करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र तोपर्यंतचे काय? शासनाने आतापासून जूनपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात अर्थसाह्य करावे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहील. कोल्हापूर विमानतळासाठी वाढीव धावपट्टी करावी, गोवा, नाशिक, इंदूरसह देशभर कोल्हापुरातून विमानसेवा सुरू व्हावी, कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव द्यावे, कोल्हापूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशा मागण्याही खा. शाहू महाराज यांनी केल्या.
सोहळ्याला लोकगंगेचा महापूर...
हा आगळावेगळा सोहळा असल्याचे सांगून पवार म्हणाले, 'यापूर्वी कोल्हापुरात मी एक सोहळा बघितला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा गौरव झाला होता. त्यावेळी चव्हाण यांनी कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती आणि वि. स. खांडेकर यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेली भावना पाहून मी पंचगंगेला अनेकदा पूर येतो हे पाहिले आहे, पण आज सत्काराच्या निमित्ताने लोकगंगेचा महापूर आल्याचे उद्गार काढले होते. तेच चित्र डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याबाबतीत आज बघायला मिळत आहे, असे म्हणत पवार यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
-----------------------------

