कोल्हापूर न्यूज / श्रीकांत शिंदे
घरातला फोन वाजतो, फोन उचलला जातो. पलीकडून एक खणखणीत आवाज येतो,
" सुनेत्रा, पोहोचलो गं. प्रवास खूप लांबचा होता त्यामुळे जरा दमलोय इतकंच. अंग मोडून आलंय.
मला कल्पना आहे तू नाराज आहेस माझ्यावर, पण फोन ठेऊ नकोस. खूप बोलायचं होतं तुझ्याशी. रामरगाड्यात ते राहून गेलं. पण आज बोलतो. ऐकून घेशील, मला समजून घेशील अशी अपेक्षा करतो.
लोकं म्हणायची दादांची राजकारणावर, प्रशासनावर मजबूत पकड आहे. दादा कोणाला हलक्यात घेत नाही. पण, नियतीवर माझी पकड खरंच नव्हती गं. काय करू, माझा नाईलाज होता. नियतीचा निर्णय मला मान्य करावा लागला आणि इथं यावं लागलं.
असो...डोळे पूस.
तुला माहिती आहे साहेबांनंतर राजकारणात जर मी कोणाला मानलं असेल तर ते म्हणजे चव्हाण साहेब. आज इथं माझ्या स्वागताला स्वतःहा चव्हाण साहेब आणि वेणूताई होत्या. मला बघताच म्हणाले,
" ये अजित. जरा वेळ चुकली तुझी, पण त्याला पर्याय नाही."
माझ्या खांद्यावर हात ठेवत माझ्या बरोबर ते आणि वेणूताई चालू लागले. भरून पावलो गं मी. आम्ही चालता चालता ते मला ह्या नवीन प्रदेशाची ओळख करुन देतं होते.
प्रदेश नवा असला तरी ओळखीची माणसं समोर येतं होती. अटलजी , सुषमाजी, बाळासाहेब, आर. आर. आबा, विलासराव देशमुख साहेब, मुंडे साहेब, पतंगराव कदम साहेब, प्रमोद महाजन बरीच मातब्बर मंडळी भेटली. ते पण जरा नाराजच दिसले माझ्यावर. पण होतील नॉर्मल. मी मात्र सगळ्यांशी हसतमुखाने भेटलो. आता काय रोज भेट होतंच राहील.
मजेमजेत चव्हाण साहेब म्हणाले, " एक छोटी विधानसभा चालू करूयात इथं" त्याचं हे वाक्य ऐकताच एकच हास्यकल्लोळ झाला.
तिथून जरा पुढे आलो तर एक प्रयोग शाळा दिसली. आत मधे डोकावून बघितलं तर कलाम सर काहीतरी प्रयोग करत होते. हळू आवाजात मी त्यांना हाक मारली,
" कलाम सर नमस्कार." त्यांनी मागे वळून पाहिलं आणि म्हणाले,
" अरे अजितजी आप यहाँ ? " बडे गलत वक्त पे आप आये हो यहाँ. चलो ठीक है, अभी आये हो तो आते रहेना मिलने. कुछ किताबे लगे तो हक्क से लेके जाना. "
त्यांचा निरोप घेऊन मी पुढे आलो.
एका कोपऱ्यातून जोरजोरात हसण्याचा आवाज कानी पडला म्हणून वाट वाकडी करून गेलो. बघतो तर काय! इथं हास्य जत्रा चालू होती. आणि कलाकार होते दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, मच्छिंद्र कांबळी, सतीश तारे.
त्यांच्या बरोबर बसलो. खळखळून हसलो.
पण मनात सल होती. तुम्हाला रडवून मी मात्र इथं आलोय.
एक दादा दुसऱ्या दादाला म्हणाले,
" दादा, या उद्यापासून आमच्या हास्य जत्रेत. तुमचा विनोदी स्वभाव आम्हाला जरा अनुभवायची संधी द्या. तारे कसे आपल्या विनोदाचे तारे तोडतात ते ऐकायला या."
तिथून पुढे आलो. आता बाबांना शोधतोय. अजून भेट नाही झाली, पण होईल. आता आम्ही इथच आहोत.
इतक्यात समोर आले रतन टाटा जी, लक्ष्मणराव आणि शंतनुराव किर्लोस्कर. मला म्हणाले, " अर्थमंत्री स्वतःहा आलेत. आता आपल्याला बजेटची काळजी नाही. एक उत्तम असा व्यवसाय चालू करू."
कानावर मधुर सूर पडले. लतादीदी, किशोर कुमार, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी ह्यांची सुरेल मैफिल रंगली होती. त्यांच्यातच पू. ल. देशपांडे, ग. दि. मा, बाबुजी, ग्रेस, कुसुमाग्रज, विं.दा. करंदीकर, डॉ.लागू, गिरिश कर्नाड, स्मिता पाटील भेटले. कलाकार कट्टा. नुकतेच आलेले धरमपाजी देखील भेटले.....
अजूनही भरपूर मंडळी आहेत इथं. हळू हळू तीही भेटतील.
सुनेत्रा, मला माहिती आहे, डाव अर्ध्यात सोडून आलोय मी. पण काय करू, माझ्या हातात काहीच नव्हतं. नियती समोर हा दादा हतबल झाला. नियतीचे फासे उलटे पडले. मांडलेला डाव उधळला. तुझ्या आणि कुटुंबाची मानसिक अवस्था मी समजू शकतो.
माझं ऐकशील! दुःख विसरण्याचा प्रयत्न कर. स्वतःला कामत गुंतवून घे. साहेबांची कास सोडू नकोस. स्वतःहा बरोबर त्यांना सांभाळ, धीर दे. सुप्रियाला जप. तिचा हात घट्ट पकडून ठेव.
आईचा तर मी गुन्हेगारच आहे. तिचा आधार तर तू होतीसच पण आता खंबीर आधार हो. शून्यात गेली आहे ती.
पार्थ, जय, युगेंद्र, रोहित ह्यांच्या पाठीशी उभी रहा. मुलं
तरुण आहेत, धडाडीची आहेत. त्यांना कर्तबगार होण्यासाठी मदत कर. आपल्या सुनांना सासऱ्याची उणिव जाणवू देऊ नकोस.
माझ्या महाराष्ट्राला आणि बारामतीला जप.
सुनेत्रा, डोळे पूस आणि लाग कामाला. मी इथून बघतोय.
ठेवतो....
तुझा अजित.
-------------------------------

