सदगुरू बाळूमामांचा भंडारा. लाखो भाविकांच्या भक्तीचा अदभूत उत्सव.मामांचा अवतार भक्तांच्या उद्धारा साठी अशी दृढ श्रद्धा.

Kolhapur news
By -

 

               


               कोल्हापूर न्यूज  / वि .रा.भोसले

   

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शेवटी भरणारी संत बाळूमामा यांच्या भंडाऱ्याची यात्रा म्हणजे एक भक्त सैलाब असतो.भाव भक्तीचा  तो अदभूत उत्सव असतो.


  "जय बाळूमामा "आणि "बाळूमामाच्या नावानं चांगभलं "या जयघोषाने सारे वातावरण भारून गेलेले असते.हा जयघोष म्हणजे भक्तांच्या आंतरात्म्याने मामांना घातलेली साद असते.


    बाळूमामांच्या कडे केवळ ईश्वरीय अवतार म्हणूनच पाहिले जात नाही.भोळ्या भाबड्या भक्तांना मामा म्हणजे आपला सखा वाटतो. दुःखात आणि संकटात धावून येणारा हा सखा फक्त भावाचा भुकेला असतो. ना सोन्या चांदीचे दागीणे,ना हिरे जडीत मुकुट.श्रद्धेने वाहिलेला पुष्पहार हेच त्यांचे वैभव.


     विजया दशमी पूर्वी जसा नवरात्र उत्सव असतो तसा हा मामांचा भंडारा उत्सव पहायला मिळतो.लाखो भक्त नऊ दिवस उपवास करतात. पायात चप्पल नाही, पोटभर अन्न नाही.एखादं फळ आणि दही भाताची मुदी यावर  नऊ दिवस काढतात.मनात नामजप सुरु असतो.बाळूमामांच्यावरच्या या श्रद्धेला मोल नाही.केवळ महाराष्ट्रच  नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश गोवा या ठिकाणाहून लक्षावधी भक्त  या यात्रेला येत असतात.


     सदगुरु संत बाळूमामांचा जन्म 1892 साली झाला. त्यांचे सारे जीवन ईश्वरीय चमत्कारांनी भरलेले असले तरी प्राणीमात्रा विषयी भुत दया बाळगणे हा त्यांचा स्थायी भाव होता. रानोमाळ आणि डोंगर दऱ्या तून बकऱ्यांच्या पाठोपाठ फिरण्यात त्यांचे आयुष्य गेले. बकऱ्यांवर त्यांचे अतोनात प्रेम. तितकेच भक्तांच्या वर सुद्धा. आजही मामांची लाखो बकरी आहेत. त्यांचा ही उत्सव असतो.मामांच्या ठायी असलेल्या ईश्वरीय शक्तीचा प्रत्यय त्यांच्या अनुयायांना जागो जागी यायचा. गावा गावात चर्चा होत राहायची. मेंढपाळ असलेल्या मामांच्या ठायी भक्तांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाल्या सारखे वाटायचे.


      मामांच्या भक्तांमध्ये समाजातील सर्व स्तरातील लाखो लोकांचा समावेश आहे. महिलांचे प्रमाण सुद्धा भरपूर आहे.भंडारा उत्सवात भजन, कीर्तन प्रवचन, सामूहिक गाणी  रोषणाई आणि शेवटी खिरीचा प्रसाद असतो. सेवादारांची  संख्या सुद्धा मोजता न येण्या सारखी असते. जेवण करणे,वाढणे, पाणी  पुरवठा,खरकट्या पत्रावळ्या उचलणे किंवा इतर स्वच्छतेची कामे मामांची सेवा म्हणून विना मोबदला केली जातात.कंत्राटदार पाण्याचे टँकर मोफत पुरवतात. गडहिंग्लज चे मुंबईकर दरवर्षी मंदिर आणि परिसर फवारणी यंत्राने धुवून काढतात. स्थानिक सेवक मदत करतात. सुरक्षा रक्षक अहोरात्र डोळ्यात तेल घालून राबत असतात. कोणताही अनुचित प्रकार घडू देत नाहीत. मामा हे सर्व करवून घेतात.


    पाटगाव येथील मुळे महाराज हे मामांचे गुरु होते. ते मांसाहारी होते.. एकदा मामांच्या ताटात मटणाचे सुके वाढण्यात आले. गुरूंना मामांची जणू परीक्षा घ्यायची असावी. त्या सुक्याचे वांग्याच्या भाजीत रूपांतर झाले अशी महती मामांच्या बाबतीत सांगितली जाते.असे अनेक चमत्कार त्यांच्या चरित्रात सांगितले आहेत.निसर्ग सुद्धा मामांच्या आधीन होता.कापशी येथील पहिल्या भंडाऱ्याला महाप्रसाच्या वेळी आकाशात पावसाचे ढग जमा झाले. नांगरलेल्या शेतात पंक्ती बसल्या होत्या. पाऊस कोसळला तर खिरीचा सगळा प्रसाद माती मोल होणार होता. मामांनी ढगांच्या दिशेने मूठभर भंडारा फुंकला. क्षणार्धात ढग पांगले आणि पाऊस ही गेला. दरवर्षी भंडाऱ्यात गडगडणारे ढग मामांच्या दर्शनाला येतात असे म्हणतात.


   सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक वसंतराव देशपांडे हे मामांचे परम भक्त होते.मामांच्या भंडाऱ्याला ते यायचे, सुमधुर गाणी गायचे. त्यांचे चिरंजीव शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे सुद्धा मामांचे  भक्त आहेत. अशा नामवंत आसामी मामांच्या भक्ती रसात डुंबून गेलेल्या आहेत. मुरगूड चे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर देशमुख हे सुद्धा मामांचे भक्त आहेत. मामांचा महिमा त्यांनी साता समुद्रापार पोचवला आहे. मामांचा ओवी रुप ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला आहे.  बाळूमामा असे भक्तांच्या मना मनात आहेत. त्यांच्या दैनंदिन रहाटगाडग्याने व्यापलेल्या जीवनात सुद्धा ते व्यापून राहिलेले आहेत.


     सन 1966 साली आदमापूर येथे मामांनी देह ठेवला. ते देहाने गेले असले तरी भक्तांच्या उद्धारासाठी त्यांचा आत्मा चिरंतन रूपाने वावरत असल्याची श्रद्धा भक्तांच्या मध्ये आहे.


           

       ------------------------