कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या मुंबई आझाद मैदानावरील टप्पा अनुदान मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा असून बुधवार दि.१ जुलै रोजी व्यासपीठातंर्गत सर्व संघटनाचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित शाळांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होतील, अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे झालेल्या व्यासपीठाच्या तातडीच्या सभेत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी एस. डी. लाड होते.
टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही या सभेत करण्यात आली. रविवार दि. २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी) परीक्षेचा पेपर फुटल्याने या परीक्षेला बसलेल्या ४ लाख २८ हजार १२२ परीक्षार्थी यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून या पेपर फुटीची पूर्ण चौकशी करून दोषी असलेल्या सर्वांच्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करावी तसेच याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अशीही मागणी या सभेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली. या घटनेचा व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांनी तीव्र निषेध केला.
याप्रसंगी चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, बी जी बोराडे, प्रा. सी. एम. गायकवाड, बाबा पाटील, सुधाकर निर्मळे, राजेश वरक ,एन. आर. भोसले, राजेंद्र कोरे, इरफान अन्सारी, मनोहर जाधव, सुभाष खामकर,के. एस. मगदूम , डी. ए. चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर :शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलतांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर एस. डी. लाड, राहुल पवार, आर. वाय. पाटील आदी.
-----------------


