कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने ०७ व ०८ जुलै २०२६ रोजी राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे खंडेराव जगदाळे यांनी दिली.
या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो शाळांमधील अध्यापनाचे कामकाज दोन दिवस ठप्प ठेवून जवळजवळ 40हजार शिक्षक आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुदानासह विविध मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून, अखेर शाळा बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेने आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून शासनापर्यंत आपल्या न्याय्य मागण्या पोहोचवाव्यात, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
संघटनेच्या मते, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी वर्षानुवर्षे प्रामाणिक सेवा बजावली आहे; मात्र त्यांना आर्थिक व प्रशासकीय न्याय मिळालेला नाही. त्यामुळे हा लढा केवळ शिक्षकांचा नसून शिक्षण व्यवस्थेच्या सन्मानासाठी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक समन्वय संघाने दिला आहे. या प्रसिध्दी पत्रकावर शिवाजी कुरणे, चंद्रकांत बागणे, रत्नाकर माळी, सुभाष खामकर, केदारी मगदूम, भारत शिरगावकर आदींच्या सह्या आहेत.
-------------------------------

