कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहरात भरदिवसा गोळीबार करून दहशत माजवणारे दोन्ही आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून (LCB) अवघ्या 12 तासात जेरबंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवून या दोन आरोपींना जयसिंगपूर येथील अंकली पुलाजवळ सापळा रचून अटक केली. हा गोळीबार 'सुपारी' देऊन करण्यात आल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मोकावरील आरोपीवर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी १६ जुलै ला दुपारी घडली. नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंगरोडवरील 'स्टार लोकल मार्ट'जवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी मोकावरील आरोपी सूरज साखरेवर गोळीबार केला. सूरज साखरे हा स्वतः पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून 'मोका' (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यातून सध्या जामिनावर बाहेर होता. मारेकऱ्यांनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानेच गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि शहर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दोन विशेष पथके तैनात केली. जखमी सूरज साखरे याच्या विरोधकांची माहिती गोळा करत असतानाच, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हॉटेल्स आणि लॉजेसची कसून तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे घटनास्थळी मोपेड दुचाकीवरून आलेले दोन संशयित निष्पन्न झाले.
आरोपींचा माग काढत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना अत्यंत महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती मिळाली. गोळीबार करणारे दोन्ही आरोपी विक्रमनगरचा देवा उर्फ रफिक मुल्ला आणि मणेरमळ्याचा शाहबाज मुल्ला हे असून, गुन्ह्यानंतर ते कर्नाटकात पळून गेले होते. ते शुक्रवार दि.१७ ला जयसिंगपूर येथील अंकली पुलावरून कोल्हापुरात परतणार असल्याची टिप पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव पाटील, संतोष बरगे आणि गजानन गुरव यांच्या पथकाने अंकली पुलाजवळ फिल्डिंग लावली. पुलाजवळ संशयास्पदरित्या फिरत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या संशयितांनी पोलिसी खाक्या दाखवताच, सूरजला ठार मारण्याच्या उद्देशानेच गोळीबार केल्याची कबुली दिली.
कोल्हापूर पोलिसांच्या प्रभावी कारवाईचे उत्कृष्ट उदाहरण
कोल्हापूर पोलिसांनी भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक करून तातडीने आणि प्रभावी कारवाईचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. या जलद तपासामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, कायद्याचा धाक कायम असल्याचा ठोस संदेश गुन्हेगारांना मिळाला आहे.
-------------------
नागरिकांच्या मध्ये सुरक्षिततेची भावना
गुन्हा कितीही गंभीर असो, कायद्याच्या हातातून कोणीही सुटू शकत नाही, हे कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींना गजाआड करून पुन्हा एकदा सिद्ध केले असल्यामुळे नागरिकांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
-----------------------

