निपाणी : सर्व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, निपाणी शहर गांजा मुक्त करावे, प्रलंबित नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात, नगरपालिका व शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारावर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी ४ जेआर मानवाधिकार संघटनेच्या वतीने तहसिलदार कार्यालयासमोर धरणे व उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संघटनेच्या मागण्यासंदर्भात प्रशासनाने जागरुक राहून तात्काळ शहराच्या विविध समस्या सोडविण्यासाचे आदेश दिले. तर लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला दिला.
बुधवार दिनांक १५ जुलै रोजी सकाळी १० वा. तहसिलदार कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. अच्युत माने, अभय मानवी, प्रा. आर. के. दिवाकर, एन. डी. जञाटकर, जुबेर बागवान, विठ्ठल वाघमोडे आदीनी विचार व्यक्त करून निपाणी शहर व उपनगतील भेडसावणाऱ्या समस्या, नगरपालिका आणि इतर शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारा विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंदोलनस्थळी प्रांताधिकारी संपगावी, तहसिलदार सुरेश मुंजी, पालिका आयुक्त गणपती पाटील यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारुन याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
संघटनेचे अध्यक्ष अशोक खांडेकर यांनी निपाणीतील सर्व शासकीय कार्यालयात कर्मचारी व अधिकाऱ्यांच्यासाठी बायोमेट्रिक हजेरी व ये-जा नोंदणी सक्तीची करावी. निपाणी शहर गांजा मुक्त करावे. यासह इतर प्रलंबित स्थानिक समस्या तात्काळ मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी केली.
यावेळी विविध संस्था, संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी दिलीप पठाडे, दत्ता नाईक, संजय सूर्यवंशी, आनंद संकपाळ, झुंजार दबडे, शकील चावलवाले, अशोक खांडेकर, सचिन पोवार, ज्ञानेश्वर चव्हाण, अविनाश माने, संतोष मावरकर, विशाल कांबळे, योगेश कावले, युवराज शेटके, योगेश पोतदार, ए.आय. हलगले, मोहन पाटील, संतोष कुर्ले, मोहम्मदशकी कुमधीडे यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------

