नवी दिल्ली : सांगली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत विकास सोसायटी गटातून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर या महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी पार पडली. सांगली डीसीसी बँक निवडणुकीतील जत सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज बाद करण्यात आला होता.मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने तो निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे, आमदार पडळकर यांना हा मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या सुनावणीदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने देशातील प्रसिद्ध विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि आनंद लांडगे यांनी जोरदार युक्तिवाद केला. दुसरीकडे, त्यांचे प्रतिस्पर्धी व विरोधक विक्रमसिंह सावंत यांच्याकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने पडळकर यांच्या बाजूने निर्णय देत त्यांचा अर्ज कायदेशीर ठरवला. त्यामुळे त्यांना आता निवडणूक लढवता येणार आहे.
----------------------

