कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शंकर रावण उर्फ शंकर पेंटर या नावाने प्रसिद्ध असलेल्या मुरगूड मधील एका अवलिया चित्रकाराची चित्रकलेतील साधना एखाद्या तपस्वी साधकाशी स्पर्धा करेल अशी आहे.वयाच्या सत्तरीत सुद्धा शंकर पेंटर फलक रंगवण्याचे, भिंती चित्रे काढण्याचे काम करतात. त्यांच्या प्रत्येक चित्रात जिवंतपणा भासतो.
तीस चाळीस वर्षा पूर्वी म्हणजे डिजिटल क्रांतीच्या आधी त्यांच्या, फलकांना, चित्रांना खुप मागणी असायची. छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या शंकर पेंटर यांच्या चित्रकलेशिवाय अपुऱ्या वाटायच्या. पुढे डिजिटल फलक आले आणि शंकर पेंटर यांच्या कलेची उपेक्षा होऊ लागली.कठीण सांसारिक परिस्थितीला तोंड देत त्यांनी कलेची उपासना सुरू ठेवली. सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांच्या तांत्रिक देखाव्यांना खूप मागणी होती. शेतकऱ्यांची जीवनपद्धती बैलगाड्यांच्या शर्यती आणि सीमेवरील जवानांच्या शौर्याच्या कथा त्यांनी या देखाव्यातून मांडल्या. हजारो लहान थोर प्रेक्षकांनी रांगा लावून हे देखावे पाहिले.कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांची साधना सुरू राहिली.
थोर साहित्यिक ना.सि.फडके आणि वि. स. खांडेकर यांच्या मधील कलेविषयीचा संवाद वृत्तपत्रातून खूप गाजला होता.
'कलेसाठी कला की जीवनासाठी कला 'असा परिसंवादाचा विषय होता.शंकर पेंटर यांनी 'कलेसाठी कला 'जोपसली. पोट भरण्यासाठी कलेचा व्यापार आणि वापर त्यांनी केला नाही.
अगदी परवाचीच गोष्ट. मुरगूड येथील ग्रामदेवता अंबाबाई मंदिराच्या मागे व गाव तलावाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क नावाची सुंदर बाग आहे. या बागेकडे प्रशासनाचे तथा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाल्याने बागेची खूप पडझड झाली होती. 'ऑक्सिजन पार्क डायलेसिसवर ' असे मथळे वृत्तपत्रातून झळकू लागले. नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि लोक नियुक्त नगराध्यक्षा सौ.सुहासिनी देवी प्र.पाटील यांनी ऑक्सिजन पार्क चे नूतनीकरण केले.बागेच्या भिंतीवर सजीव सृष्टी शी निगडित असलेल्या पंचमहाभूतांची चित्रे रेखाटली.पृथ्वी,आप (जल ), वायू,,तेज (अग्नि )आणि आकाश अशी ही पंच महाभुते आहेत. शंकर पेंटर यांच्या कुंचल्यातून ही पंचमहाभूते ऑक्सिजन पार्कच्या भिंतीवर हुबेहूब साकारली.
रसिक नागरिकांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले.सकाळ,संध्याकाळ फिरायला जाणाऱ्या नागरिकांना शंकर पेंटर यांची ही कला साद घालते.शंकर पेंटर यांनी शेवटपर्यंत कले साठी कला जपली.अशा अवलिया कलाकाराचा नगर परिषदेकडून यथोचित सत्कार व्हावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
----------------

