कोल्हापूर न्यूज / कागल प्रतिनिधी
जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या सौ.सविता चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण व प्राणी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. पुरस्काराचे नुकतेच इस्लामपूर येथे वितरण करण्यात आले.याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणीसंवर्धन अभियान महाराष्ट्र राज्य अंतर्गत कागल तालुका महिला प्रमुखपदी कार्यरत असणाऱ्या सौ. सविता पाटील यांनी पर्यावरण रक्षण हेच देशाचे रक्षण या उक्तीप्रमाणे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल,कागल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना तसेच पालकांना पर्यावरण रक्षण, प्राणीसंवर्धन अभियानात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले आहे. अनेक कार्यक्रमात त्यांनी वृक्षवाटप केले आहे. तालुक्यातील शाळांना रोपवाटप केले आहे. स्वतः दरवर्षी वृक्षारोपण करतात. प्राणी व पक्षांना उन्हाळभर खाऊ व पाणी मिळावं यासाठी आपल्या विद्यार्थ्यांमार्फत बर्ड फीडर बनवून पक्षांची उन्हाळ्यात काळजी घेऊन पर्यावरणाचे रक्षण केले आहे. एक मूल एक झाड हा उपक्रम राबवून मुलांना घराजवळ, शेतात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यास प्रवृत्त केले आहे. प्लॅस्टिकला आळा घालून कापडी पिशव्यांवर नागरीकांनी भर द्यावा यासाठी विद्यार्थ्यांमार्फत कापडी पिशव्या बनविणे स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संतुलनाचे महत्त्व सांगणारे बीजारोपण केले आहे. पर्यावरणविषयक घोषवाक्य स्पर्धा त्या नेहमी घेत असतात.तंबाखूमुक्त परीसर हे अभियान राबवूनही त्या पर्यावरणाचे महत्त्व जनजागृतीतून रुजवितात.
सौ.सविता पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणीसंवर्धन अभियान महाराष्ट्र राज्य तसेच पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय,उपवनसंरक्षक कार्यालय,प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने माजी आमदार भगवानराव साळुंखे, विशाल जाधव व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
