नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयू स्टुडंट युनियन) चार वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त आघाडीने संघ-भाजपशी सलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करत दबदबा कायम राखला. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या विजयानंतर रविवारी रात्री 'जेएनयू'मध्ये जल्लोषाचे वातावरण होते. 'जय भीम', 'लाल सलाम'च्या घोषणांनी विद्यापीठ दणाणून गेले होते.
या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि सह-महासचिव ही चारही पदे डाव्या आघाडीने जिंकली असून तब्बल ३० वर्षांनंतर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी दलित उमेदवारांची निवड झाली आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (आयएसा) धनंजय यांनी (२ हजार ५९८ मते) 'अभाविप'च्या उमेश अजमेरा यांचा (१ हजार ६७६ मते) पराभव केला. यापूर्वी १९९६-९७ मध्ये दलित समाजील भट्टीलाल बैरवा 'जेएनयू'च्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले होते. बिहारमधील गया येथील धनजंय 'जेएनयू'मध्ये पीएचडी करत आहेत. निवडणूक प्रचारामध्ये विद्यापीठाच्या निधी पुरवठ्यामध्ये झालेली कपात आणि शुल्कवाढीचा मुद्दा अत्यंत प्रभावी ठरला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पराभूत उमेदवार विद्यार्थी


