राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप ; नीलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश

Kolhapur news
By -

             


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 मुंबई  : लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार नीलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.


  नीलेश लंके यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थित सोमवारी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती. आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्याकडून नगर दक्षिणमधून लंके यांची उमेदवारी देखील जाहीर  होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, खा. सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखेही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.


  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मतदारसंघाची चांगलीच चर्चा सुरू आहे. खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार नीलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे कारण शहरात  दोन्ही गटाकडून  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात नीलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.


     नीलेश लंके  यांच्याविषयी...... 

   नीलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला.


दरम्यान, नीलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली. वयाच्या १५ व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या

गावात मोठा जनाधार मिळवला . पण २०१८  साली त्यांना शिवसेनेतून काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यास सुरुवात केली.