केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीचं जागावाटप ठरलं... कुणाला किती जागा...सविस्तर वाचा

Kolhapur news
By -

              


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे पुढे आले आहे. महायुतीत 32 जागा भाजपा, शिवसेना 10 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे.

     मिशन ४०० मध्ये भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही, यासाठी सर्वाधिक जागा भाजपच्या चिन्हावर लढण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर राज्यातील जागेबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.


   दरम्यान त्याचबरोबर भाजप लोकसभेत 30 ते 32 जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाला 10 ते 12 जागा, तर अजित पवार गटाला 6 ते 8 जागा मिळतील, असे अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 400 चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे.

    

अजित पवार हे रायगड, परभणी, बारामती, शिरुर आणि आणखी 2 जागांसाठी आग्रही आहेत.तर अजित पवारांना जागा सोडण्यास भाजपाने तयारी दाखवली आहे. काही जागांवर शिंदे-अजितदादांचे उमेदवार कमळ चिन्हावरही निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन शहा यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीत सर्वकाही अंतिम करण्यात आले.