कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
कोल्हापूर ला छत्रपतींच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आता संपुष्टात आली आहे.विद्यमान खासदार प्रा.संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
तिकडे बारामती ला नणंद भावजय यांची लढत होणार हे निश्चित झाले आहे.विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार आहेत.
या दोन्ही लढती महाराष्ट्रीय मतदारांना हिंदकेसरी सारख्याच महत्वाच्या वाटतात.
इकडे काँग्रेस विरुद्ध शिवसेना (शिंदेगट) आणि तिकडे शरदचंद्र राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी .
इकडे काँग्रेसच्या पंजाचा छेद घेणारा बाण शिवसेनेच्या धनुष्यातून सुटणार का ?
तिकडे घड्याळाचा गजर तुतारीच्या निनादाला थोपवेल का ?
सारीच गूढ वाटणारी उत्सुकता.
थोडे मागे जाऊया. म्हणजे ही गूढता थोडी कमी होईल.
छत्रपती घराण्याची ही कांहीं पहिलीच लढत नाही. विजया राणीसाहेब एकदा विजयी झाल्या होत्या.संभाजी राजे स्व.सदाशिवराव मंडलिक यांचेकडून हरले होते.(२००९).
सद्याचे छत्रपती हे नागपूरहून इकडे दत्तक आले आहेत.पद्माराजे यांच्या ऐवजी त्यांचे दत्तक विधान मंजूर झाले होते. पद्माराजेंचा हक्क डावलला गेल्याने त्यावेळी करवीर नगरीत बरीच खळबळ माजली होती.
शाहू राजे छत्रपती खासदारकीच्या निवडणुकीत उतरल्याने या जुन्या आठवणीचा आरसा मतदारांना दाखवला जाणार हे ओघानेच येते.शिवाय छत्रपती या आडनावावरून सुध्दा संभ्रम होऊ शकतो. खरं तर ही गादीची उपाधी आहे असे मानले जाते.भोसले हे आडनाव बदलून छ्त्रपती हे आडनाव लावण्याचे कारण नव्हते असे या गादीचे चाहते म्हणत आहेत.गादीला मान असतो..तिथे सगळे नतमस्तक होतात.मानकरी मुजरा करतात व सामान्य नागरिक नुसताच नमस्कार करतात.
भारतीय जनता पक्षाचा भक्कम पाठिंबा असल्याने मान गादीला मत मोदींना असा दुसरा एक विचार प्रवाह वाहू लागला आहे.
स्व.सदाशिवराव मंडलिक यांनी त्यावेळची निवडणूक राजा विरुद्ध प्रजा या घोषणेवर आणि त्यांनी केलेल्या कामावर जिंकली होती.जनसामान्यांचा त्यांना अफलातून पाठिंबा मिळाला होता.
आज या फॉर्म्युल्या चा वापर होण्याची सुध्दा शक्यता आहे.
या मतदारसंघाचे राजकीय चित्र सुध्दा पहा ण्यासारखे आहे.एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असे कोल्हापूरला समजले जायचे.पुरोगामी विचारांची बीजे या काळात अंकुरली ,जोपासली आणि वाढली.शाहू छत्रपती (पहिले) यांची सुधारणावादी तत्वे, जनसामान्यांत जपली गेलेली त्यांची अलौकीक प्रतिमा आणि त्यातून निर्माण झालेले त्यांच्या विषयीचे प्रेम आणि स्वाभिमान ही करवीरवासीयांची जणू नैतिक Fixed Deposit होती.
इंग्रज सुध्दा शाहू महाराजांच्या लोकप्रियतेला वचकून असायचे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,माणगाव परिषद ,विविध वसतिगृहे,राधानगरी धरण,या ऐतिहासिक परंपरा जनतेने जपल्या होत्या .महाराजांच्या त्या भव्यातेला त्या राजेशाही फेट्याला आजही लोक सलाम ठोकतात.भवानी मंडप हा त्याचा साक्षीदार आहे.
आज त्यामधील काय शिल्लक आहे ?
फक्त दसरा चौकातील सोमोलंघन.
समाजाशी राजघराण्याची जोडलेली नाळ ही तेवढीच.तरीही आम. सतेज पाटील व पी एन पाटील या काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू असेल.
संजय मंडलिक यांना त्यांच्या वडिलांचा वारसा लाभला आहे.उच्च विद्या विभूषित असल्याने वक्तृत्वाने त्यांना साथ दिली आहे.ना. मुश्रीफ आणि. महादेवरव महाडिक गटाचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू असेल.या शिवाय के.पी.पाटील, आम.प्रकाश आबिटकर ,राजेश पाटील,राजेश क्षीरसागर ,यांच्या पाठिंब्यामुळे त्यांची बाजूही बळकट होऊ शकते.
तिकडे बारामतीत सुप्रियांच्या कर्तृत्वाला दादांच्या लाडक्या लोकप्रियतेचे आव्हान असेल.
शरद पवार यांना सहानुभूती असेल.पाऊस पडला तर ती अधिक वाढेल.
बिन प्राण्यांची सर्कस ही चित्तथरारक असते.
या दोन्ही लढती त्याच चष्म्यातून पाहिल्या जातील.

