मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे. कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार घोषित झाल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांची घालमेल थांबली आहे . ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नाहीत. ठाण्यावर भाजपने तर नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केल्याची माहिती आहे.
याआधी भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार यांनी आपले उमदेवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे वेटिंगवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. मात्र, पहिल्या यादीमध्ये श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनेला लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती जागा मिळणार, याबाबत अद्याप निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. असे असताना एकनाथ शिंदे यांनी केवळ आठ उमेदवारांची नावांची घोषणा केली आहे. मात्र, इतर ठिकाणी खासदार नाराज नको, म्हणून या पहिल्या यादीत शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव टाळण्यात आले का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.


