खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित- कोल्हापुरातील मेळाव्यात कार्यकर्त्यांचा विश्वास

Kolhapur news
By -

         

          


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मतदारसंघाच्या विकासासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार मंडलिक यांना लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून संजय मंडलिक हेच उमेदवार असतील. त्यांना पुन्हा एकदा निवडून आणू या. मुख्यमंत्री शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करू या असा विश्वास मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.
 
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झाली नाही. महायुतीचा उमेदवार कोण असणार ? या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भाजपकडूनही या जागेवर दावा केला जात आहे. तर विद्यमान खासदार मंडलिक  यांनी पुन्हा आपणालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी दैवज्ञ बोर्डिंग येथे मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केला होता. 

        
मंडलिकांचे कार्यकर्ते विकाऊ नसून विकासाच्या वाटेवर जाणारे आहेत असा विश्वास व्यक्त करून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणार असल्याने मंडलिक यांना बंडखोरी करण्याची वेळच येणार नसल्याचे अतुल जोशी यांनी स्पष्ट केले. मंडलिक गटाचा स्वभावच बंडखोरीचा आहे, यापूर्वीही सदाशिवराव मंडलिक यांनी बंडखोरी करत विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याचा इशाराही काही कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात दिला.

या बैठकीत सर्जेराव पाटील, संजय पाटील, दत्ता उगले, रामसिंग रजपूत, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, सुनील बिरंजे यांची भाषणे झाली.

या मेळाव्याला माजी नगरसेवक रमेश पुरेकर, सर्जेराव साळोखे, बाबा नांदेकर, अरुण जाधव, पी. डी. पाटील, नागेश घोरपडे, कृष्णराव कोंडेकर, कल्याणराव निकम, बाबासाहेब शिंदे, पी. डी. पाटील, संजय पाटील, शेखर मंडलिक आदी उपस्थित होते.