कोल्हापूर न्यूज / वि .रा .भोसले , ज्येष्ठ पत्रकार
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात २००९ ची पुनरावृत्ती होणार का याची तमाम मतदार संघात उत्सुकता लागून राहली आहे.
काय घडले होते २००९ मध्ये ?
सन २००९ मध्ये स्व.सदाशिवराव मंडलिक व संभाजीराजे छ्त्रपती अशी लढत होती .त्यामध्ये मंडलिक विजयी झाले होते.जनतेला त्यांनी राजा की प्रजा असे भावनिक आवाहन केले होते.
तीच परिस्थिती सद्या उद्भवली आहे.
स्व.सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव खा.संजय मंडलिक आणि शाहू छ्त्रपती अशी यंदा लढत आहे.
संजय मंडलिक हे शिवसेनेचे व शाहू छत्रपती हे काँग्रेस चे उमेदवार आहेत.
कोल्हापुरी भाषेत सांगायचे तर ही इथल्या मातीतल्या कुस्तीतील ही दंगल आहे.
कोल्हापूरची जनता अत्यंत विचारपूर्वक ठरवते ,निर्णय घेते आणि शेंडी तुटो वा पारंबी त्या निर्णयाशी घट्ट बांधील रहाते.
उदाहरण द्यायचे झाले तर टोल रद्द आंदोलनाचे देता येईल. प्रा.एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात साऱ्या जनतेने झोकून दिले होते.आंदोलन यशस्वी झाले .टोल रद्द झाला. पृथ्वीराज चव्हाण हे त्या वेळी मुख्यमंत्री होते.
पालक मंत्री होते सतेज उर्फ बंटी पाटील.
बंटी पाटील यांनी स्वतः टोल नाक्यावर टोल भरून आंदोलनातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी जनता त्यांच्यावर अधिक रुष्ठ झाली आणि मग यश घेऊनच आंदोलन थांबले.
२००९ ला सदाशिवराव मंडलिक यांना पाठींमा द्यायचा असाच निर्णय कोल्हापूरच्या जनतेने घेतला व संभाजीराजांना पराभूत केले.
राजा विरुद्ध प्रजा अशी त्यावेळची लढत चित्तथरारक ठरली होती.जनतेने राजा ला कौल दिला नाही. संभाजी राजे सध्याच्या शाहू छत्रपतींचे चिरंजीव असल्याने त्यांना राज घराण्याची पार्श्वभूमी लाभली होती.
कोल्हापुरी जनता मातीत मळलेल्या पैलवानाचा विचार अधिक करते हे त्या निवडणुकीने सिध्द झाले.
आजही तशीच कांहीं परिस्थिती दिसते.संजय मंडलिक यांचीही तुलना अशाच पैलवानाशी होऊ शकेल.
शाहू छत्रपती ना राजघराण्याची पार्श्वभूमी आहे . राजर्षी शाहूंच्या गादीचे ते वारसदार असल्याने गादीला मान द्यायचा म्हणून कांहीं श्रध्दाळू मतदार तिकडे झुकण्याची शक्यता आहे.
त्यांचे कार्य काय ,सामाजिक सेवेचा त्यांचा वसा काय किंवा त्यातील अनुभव काय यांचा विचार गौण ठरतो.
स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्यावर जनतेचे निर्व्याज प्रेम होते तेच प्रेम त्यांच्या पुत्राला लाभले तर राजा विरुद्ध प्रजा या लढाईत संजय मंडलिक भारी पडतील हे स्पष्ट आहे.
या मतदार संघाच्या रचनेचा एकदा विचार करूया.
या लोकसभा मतदार संघात सहा विधान सभा मतदारसंघांचा समावेश आहे.ते असे.
चंदगड,राधानगरी ,कागल ,करवीर ,कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण .
यापैकी पहिल्या तीन मतदार संघात सद्याचे वैद्यकीय मंत्री असलेले ना.हसन मुश्रीफ यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.
चंदगड चे आमदार राजेश पाटील ,राधानगरी भुदरगड चे आमदार प्रकाश आबिटकर ,बिद्रीचे चेअरमन के.पी.पाटील व सर्व संचालक मंडळ शिवाय उरलेले तीनही साखर कारखान्याचे संचालक व सभासद यांचे पाठबळ त्यांच्याबरोबर असणार आहे.
करवीर,कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण या तिन्ही मतदार संघात आ. पी .एन पाटील ,श्रीमती जयश्री जाधव व ऋतुराज पाटील या तिन्ही काँग्रेस आमदारांचा पाठिंबा शाहू छ्त्रपती यांना राहील .
अर्थात यात सर्वच मतदान एकतर्फी होईल असे नाही.
कोल्हापूर दक्षिण मध्ये सद्याचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व याच माजी आमदार अमल महाडिक यांचे ही प्राबल्य आहे.
करवीर मतदार संघात माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे पी एन.पाटील यांच्या इतकेच प्राबल्य असेल.
याशिवाय ना.हसन मुश्रीफ यांना मानणारे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील असंख्य मतदार हे मंडलिक यांचे पारडे जड करू शकतात.
ना.चंद्रकांत पाटील हे चळवळीचे भाजपा नेते म्हणुन आपले वजन टाकू शकतात.
शाहू छ्त्रपती यांनाही चंदगड ,राधानगरी व कागल मधून कांहीं प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो. कागलचे माजी आमदार संजय घाटगे हे उ.बा.ठा शिवसेनेचे नेते म्हणून कार्यरत असून ते छ्त्रपती ना पाठिंबा देतील.
प्रत्येक गट व त्यातील उपगट,राजकीय घराण्यातील भाऊबंदकी वगैरे दबाव गट दोन्हीकडे असले तरी दोन गोष्टीमुळे या निवडणुकीतील जय पराजय ठरणार असे दिसते.
त्या गोष्टी म्हणजे कोल्हापूरकरांचा टोल वाला निर्धार आणि मोदी लाटेचा प्रभाव.म्हणूनच २००९ ची पुनरावृत्ती होणार की कांहीं बदल होणार हे मतदार ठरवतील.अर्थात या कुस्ती ची उत्सुकता मात्र शिगेला पोचली आहे.

