बारामती : बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारादरम्यान अजित पवारांनी मतदारांना कचाकचा मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वाक्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. आज शरद पवार यांनीही अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. काही लोकांनी कसे मतदान करायचे हे तुम्हाला सांगितले. पण मी तसे सांगणार नाही. देणे घेणे करून मत मागण्याची आमची भूमिका नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला. या वेळी कन्हेरी या गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते.
अनेक लोक काहीतरी सांगत असतात. मात्र, आपल्याला वाद वाढवायचा नाही. कारण देणे घेणे करून मत मागण्याची आमची भूमिका नाही. लोकांमध्ये काम करायचे, लोकांना शक्ती द्यायची, लोकांची सेवा करायची आणि मते मागायची ही आमची भूमिका असल्याचा टोला देखील शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
