आदमापुर यात्रेतील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा ;भुदरगड पोलिसांचे यशस्वी योगदान

Kolhapur news
By -

          


              



          


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


आदमापुर यात्रेत प्रत्येक अमावस्येला वाहतूक कोंडी होत होती.वृत्तपत्रांनी अनेक वेळा फोटोंसह बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.कांहीं  प्रवासी संघटनांनी सुध्दा आवाज उठवला होता.ही कोंडी काहीं सुटली नव्हती.

     यंदाच्या बाळूमामा भंडारा यात्रेत मात्र कसलीच वाहतूक कोंडी झाली नाही.

  ' अहो आश्चर्यम ' असेच उद्गार यात्रेकरू कडून निघत होते.याचे श्रेय प्रामुख्याने भुदरगड पोलिसांना द्यावे लागेल.

  मुरगूड व राधानगरी पोलिसांनी सुध्दा सहकार्य केले .

  गारगोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी आदमापुर परिसरातील भौगोलिक स्थिती आजमावून वाहतुकीचा एक नकाशा तयार केला.तो समाज माध्यमातून प्रसारीत केला.त्याप्रमाणेच वाहतूक झाली पाहिजे अशी गस्त सुरू केली.मुदाळतिट्टा , आदमापूर मंदिर, निढोरी येथे पोलिस बंदोबस्तात वाहतुकीचे नियंत्रण केले.

     कसे ते पाहूया.

मुदाळ तिट्ट्या वरून मुरगूड कडे जाणारी अवांतर वाहने (यात्रेकरू सोडून) कुर ,वाघापूर व तेथून वाघापूर पाटी वरून बाहेर काढली.मुरगूड मध्ये चिंचोळ्या गल्लीतून ट्रक ,बस अशी अवजड वाहने काढणे शक्य नसल्याने वाघापूर पाटी हा पर्याय निवडला.

    मुरगूड कडून येणारी असलीच वाहने निढोरी वरून सोनाळी फाटा व तेथून तिट्टा व गारगोटी कडे अथवा बिद्री वरून कोल्हापूर कडे काढली.

    त्यामुळे झाले काय की मोठी अवजड वाहने 

आदमापुर कडे फिरकलीच नाहीत. 

    यात्रेकरू वाहने व दुचाक्या यांची पार्किंग व्यवस्था जिथल्या तिथे करून टाकल्याने यात्रेकरू भाविकांना वाहतूक कोंडीचा उपद्रव झालाच नाही.

    ही योजना भंडारा यात्रे पुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक अमास्येला सुरू ठेवावी अशी नागरिकांची मागणी आहे.त्यावर गारगोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की जिल्हा पोलिस प्रमुख यांचेकडून तशी पोलिस कुमक मिळाली तर ते ही शक्य होईल.

     वाहतूक कोंडीवर निघालेला हा तोडगा उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया यात्रेकरू नागरिकांकडून येऊ लागल्या आहेत.

    या यात्रेत पोलिसांनी जसे योगदान दिले तसे इतरही स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय कार्यालयाकडून मोलाचे सहकार्य मिळाल्याचे बाळूमामा प्रशासना तर्फे सांगण्यात आले.

   भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अर्चना पाटील,गट विकास अधिकारी शेखर जाधव,तालुका आरोग्याधिकारी डॉ. वर्धन,आर.टी.ओ.स्नेहा देसाई,ग्राम सेवक पवन बोंगाडे ,सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख डी.एस.मिरजकर,गारगोटी एस टी आगार प्रमुख प्रशांत नाईक, विकास वर्णे, काळमावाडी प्रकल्प अधिकारी (कालव्याला पाणी सोडले),वीज वितरण अधिकारी (अखंडित वीजपुरवठा),या सर्वांनी आपापली जबाबदारी उत्तम रित्या पार पडली .

  त्यामुळे देवस्थान प्रशासन व  आदमापुर ग्रामस्थ यांनी सर्वांचे आभार मानले व अभिनंदनही केले.

    बाळूमामा भंडाऱ्याचा हा गोवर्धन पर्वत पेलण्यासाठी या सर्वांनी ड्युटी रुपी काठीचा आधार दिला.बाळूमामा श्रीकृष्णाच्या रुपात आमच्या बरोबर होते अशी या सर्वांची श्रध्दा होती.



        रात्रीची गस्त व वाहतूक नियंत्रण