नाशिक : मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं, शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावे लागते, वाहतूक कोंडी होते. मोदींनी रोड शो घेतला होता, तो भाग प्रामुख्याने गुजराती आहे. मोदींना रोड शो करायचाच होता, तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता. पण मोदींचे लक्ष्य विशिष्ट वर्ग होता. मात्र, त्यामुळे लोकांना त्रास झाला, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास गेलेला आहे, त्यामुळेच ते प्रचार सभेतील भाषणातून धर्म, जातींवर बोलतात अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. आज प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. बुधवारी घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो पार पडला. यावेळी सामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला होता. यावरूनच पवारांनी मोदींचा चांगलाच समाचार घेतला आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातील कोणताही शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्याकडे यायचे असा टोलाही पवारांनी लागवला आहे.

