कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मितभाषी आणि गूढ स्वभाव आंबेडकर चळवळीत सक्रीय नसला तरी या चळवळीचा अभ्यासक... जुन्या हिंदी गाण्यांचा रसिक आणि आवडीने सूर लावणारा प्रसंगी कार्यक्रमात गाणी गाणारा... वृत्तपत्र विक्रेता बातमीदार ते आता आघाडीच्या दैनिकात वृत्तसंपादक ... नावाप्रमाणे शरीर प्रकृती असलेला ३३ वर्षे वृत्तपत्रात विशेषतः रात्रपाळी करत असूनही शरीराची रुंदी न वाढू दिलेला आरोग्य संपन्न कुमार ! अर्थात पत्रकार कुमार जंबा कांबळे ! आज २३ में कुमारचा जन्म दिवस !! यानिमित्त कुमारला वर्ग मित्रांकडून शब्द रुपातून मनःपूर्वक शुभेच्छा !!!
कुमारची परिस्थिती बेताची म्हणण्यापेक्षा हलाखीची होती. ही परिस्थिती कुमारने कधीही दाखवून दिली नाही. भांडवलही केले नाही. वसगडे ता. करवीर या मुळ गावात त्याच्या आई- वडिलांनी शेत मजुरी करुन आयुष्य खर्च केले. कुमारची आई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी, बरीच वर्षे त्या सक्रीय कार्यकर्त्या ही होत्या बोलायला परखड, वडील अतिशय शांत. आई- वडील दोघेही उन्हा-तान्हात राबायचे. संध्याकाळी जेव्हा घरी परतायचे तेव्हा त्यांच्या गप्पात आंबेडकरी विचारांचा जागर असायचा. हेच बाळकडू कुमारला मिळाले. कुमार राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधून बी.ए. इंग्लिश झाला. शिवाजी विद्यापीठातून वृत्तपत्र विद्या आणि संवादशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम कुमारने प्रथम श्रेणी मिळवून पूर्ण केला. कुमार विद्यापीठात पहिला आला. कॉलेजचे शिक्षण घेत असताना कुमार बातमीदार म्हणून दैनिकात काम करत होता, शिवाय आंबेडकर चळवळीचे आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असलेले कुमारचे मामा रघुनाथ कांबळे यांच्या कोल्हापुरातील पेपर स्टॉलवर अकरावी पासून एमजेसी होईपर्यंत अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेता म्हणून कुमारने काम केले.
मी आणि कुमार शाहू कॉलेजचे मित्र शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेच्या एकाच वर्गात. एम.जे.सी. चा अभ्यास वर्षभर एकत्र केला. या दरम्यान मी कुमारच्या घरी वसगडेला अनेकवेळा जायचो. आईची भाजी-भाकरी आवडीने खायचो. कुमारचे आई-बाबा माझी वाट पहायचे,
कुमार मितभाषी आणि शिस्तबध्द आहे. एम.जे.सी. ला कुमारने माझी सोबत धरली कारण मी विद्यापीठात जास्त वेळ ग्रंथालयात असायचो काही उचापतीही करायचो. ग्रंथालयाच्या तत्कालीन ग्रंथपाल सुमित्रा जाधव मॅडम आणि कर्मचाऱ्यांशी माझा खूप चांगला स्नेह होता. अनेकदा आग्रहाने ते मला चहाही दयायचे कर्मचारी फक्त मला प्रत्येकवेळी ग्रंथालयाच्या पहिल्या मजल्यावरील पुस्तकांच्या रॅकमधील हवे ते पुस्तक घेण्याची मुभा दयायचे याचा पुरेपूर लाभ मी घेतला. महात्वाची, नेमकी व सेमिनारच्या विषयांना आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ अन्यत्र-दुसऱ्या रॅकमध्ये ठेवायचो. यामुळे ही पुस्तक कुणालाच सापडत नव्हती. मी हवे तेव्हा पुस्तक घ्यायचो. डेव्हलपमेंट कम्युनिकेशन हे नवे कोरे पुस्तक वर्षभर मी एकटाच वापरत होतो. अशा काही उचापतींची कानकून कुमारला लागली होती, मात्र कुमारला ही आयडीया कधीच कळू दिली नव्हती.
कुमार आणि मी वर्षभर सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विद्यापीठात असायचो कुमारला मी सकाळी टेंबलाई फाट्याजवळ सायकलवर डब्बलसीट घ्यायचाे संपुर्ण विद्यापीठापर्यंतचा चढ मी डब्बलसीट चढवायचो दुपारी विद्यापीठाच्या पाण्याच्या टाकीखाली तेल- चटणी-भाकरी-लसून कांदा असा अल्पोपहार करायचा आम्ही दोघांनी मिळून या पाण्याच्या टाकीखालीच सेमिनारचे लेखन आणि तयारी, एमजेसीच्या लघुप्रबंधाची तयारी केली.
कुमारबा एम.जे.सी. च्या लघुप्रबंधाचा विषय "बहिष्कृत भारत मधील स्कूटलेख " असा होता. त्यासाठी टिपणे काढण्यासाठी तो जुन्या वहयांचे शिल्लक कागद वापरत असे. जास्तीत जास्त लेखन व्हावे यासाठी तो अक्षरे बारीक काढत असे. एम.जे.सी. ला असताना कुमारला दिल्लीतील युनायटेड मास मीडिया असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे त्याच्या एमजेसीच्या वर्षाचा आणि अभ्यास सहलीचा आर्थिक भार हलका झाला. आजही तो ही आठवण सांगताना हळवा होतो. विशेषतः विद्यापीठाच्या पाण्याच्या टाकीखालच्या गारव्यात बसून केलेल्या अभ्यासाच्या दिवसाच्या आठवणी आजही त्याच्या मनात ताज्या टवटवीत आहेत. त्या दिवसांबद्दल आणि विद्यापीठाबद्दल त्याच्या मनात अपार कृत्ज्ञतेची भावना दिसते.
कुमार एक हौसी आणि अभ्यासू पर्यटकही आहे. दैनिकात वृत्तसंपादक म्हणून काम करत असताना सलगपणे सुट्टी मिळणे कठीण असते, मात्र कमी दिवसात आणि कमी खर्चात पर्यटनाचे नियोजन कुमार करतो. गेली वीस वर्षे सलगपणे भारतातील अनेक पर्यटन स्थळे कुमारने पाहिली आहेत म्हणण्यापेक्षा अभ्यासली आहेत. कारण कुमार कोणते ठिकाण पहायला जायचे आहे त्या ठिकाणाचा किमान चार महिने आधी अभ्यास करतो. पर्यटक स्थळाच्या वैशिष्टयानुसार नेमक्या हंगामातच पर्यटन स्थळ पहायला कुटुंबासह जातो. तो कधीही पॅकेज दूर करत नाही. पर्यटन स्थळाला जाताना कैमेरा, वहीं, पेन, संदर्भ पुस्तक इत्यादी साधने त्यांच्या सोबत असतात इतकच नव्हे तर पर्यटन स्थळ आणि परिसर याचे कुमार अवलोकन करतो. कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देताना स्वाभाविकपणे मानव्य पर्यटनही होते. या पर्यटनातही दोन प्रकार आहेत. जुने स्नेही पर्यटन स्थळी भेटतात व पर्यटन ठिकाणी व्यवसायिकाकडून होणारा पाहुणचार व्यवसायिक आपलेपणाने पर्यटकांना मदत करतात आणि व्यवसाय वाढवितात मात्र ही उणीव कोल्हापूरात जाणवते असे कुमारचे मत आहे.
पर्यटनामुळे उभारी येते. उत्साह वाढतो. आयुष्य वाढते कुमारला मानव्य पर्यटनाचा एक भाग म्हणून वाढदिवसानिमित्त त्याच्याशी बोलूया !
- वर्गमित्र
एम.जे.सी. - १९९८
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
लेखन : भारतभूषण केशव गिरी

