देशात मनुस्मृति लागू करायचा भाजपचा डाव - माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ; अभ्यासक्रम आराखड्यातून आक्षेपार्ह भाग न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Kolhapur news
By -

 

                    


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क

     

       मुंबई  : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे घाटत आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCERT) ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. हा प्रकार मनुची विभाजनकारी मूल्ये विद्यार्थ्यांच्या निरागस मनावर लादण्याच्या डाव असून काँग्रेसचा याला तीव्र विरोध आहे. अभ्यासक्रम आराखड्यातून हा आक्षेपार्ह भाग काढवा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी शालेय शिक्षण मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

    भाजपा-आरएसएस संविधान बदलून देशात मनुस्मृती लागू करू पाहत आहेत हे उघड आहे. लोकसभेत ४०० जागांच्या बहुमतासह सत्ता मिळाली की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार अशी जाहीर भाषा भाजपाच्या नेत्यांनी केली आहे आणि आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर झालेला महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात (एससीएफ) मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीतील श्लोकाने करण्यात आली आहे. ज्या मनूस्मृतीमुळे वर्णव्यवस्था निर्माण केली, बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले, 

ज्या मनूस्मृतीमध्ये महिलांना समाजात दुय्यम स्थान देण्यात आले आणि ज्या मनुस्मृतीला महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातांनी जाळले त्याच मनुस्मृतीचा अभ्यास शाळेकरी विद्यार्थांनी करायचा का? असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.


अभ्यासक्रम आराखड्यातून आक्षेपार्ह भाग न  काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा